भंडारा जिल्ह्यात आमदाराने केली कर्मचाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:36 AM2018-06-26T10:36:00+5:302018-06-26T10:38:53+5:30
आमदार चरण वाघमारे यांनी फोन करून त्या कर्मचाऱ्याला स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात बोलावले आणि त्यांच्या सह २० ते २५ कार्यकर्त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री तुमसर येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शिवी दिल्याच्या कारणावरून संतप्त आमदार चरण वाघमारे यांनी फोन करून त्या कर्मचाऱ्याला स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात बोलावले आणि त्यांच्या सह २० ते २५ कार्यकर्त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री तुमसर येथे घडली. आशिष राजपाल चौरे (२१) रा.विनोबा भावे नगर तुमसर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
आ.चरण वाघमारे यांनी रविवारी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कक्षात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली होती. बाजार समितीत कार्यरत आशिष चौरे हा कर्मचारी कर्तव्यावर असताना, हे बाजार समितीचे कार्यालय आहे. कुण्या पक्षाचे कार्यालय नसून आमदार पदाचा दुरूपयोग करीत असल्याचे बाहेरच्या कार्यकर्त्यांजवळ बोलला.
बैठक आटोपून आ.वाघमारे बाजार समितीतून स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात गेले असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी चौरे नामक कर्मचारी तुम्हाला शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे आ.वाघमारे यांनी स्वत: सायंकाळी ६.१९ वाजता चौरेला फोन करून जनसंपर्क कार्यालयात बोलावले. जास्त नेतागिरी आली का अंगात असे म्हणत शिवीगाळ करीत कार्यालयात डांबून २० ते २५ कार्यकर्त्यासह लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.
जखमी आशिष चौरे याला प्रथम तुमसर उपजिल्हा रूग्णालयात आणि नंतर जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. याबाबत आशिषचे काका धनराज चौरे यांना कळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात केली. परंतु तुमसर पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी नकार दिला. मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्याचा सल्ला देऊन परत पाठविल्याचा आरोप चौरे यांनी पत्रपरिषदेत केला.
माझ्या कार्यालयात कुणालाही मारहाण करण्यात आली नाही. मद्यप्राशन करून कार्यालयात गोंधळ घातल्यामुळे मी पोलिसांना बोलावून त्याच्याविरूद्ध तक्रार दिली. कुणाच्या घरी, कार्यालयात जाऊन गोंधळ घालणे हा प्रकार योग्य नाही. या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कुणीही विरोधाला विरोध करू नये. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
- चरण वाघमारे, आमदार तुमसर.
कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. नियमाप्रमाणे कारवाई न झाल्यास आम्ही कुटुंबांसह पोलीस ठाण्यासमोर धरणे देऊन लोकशाही पद्धतीने न्याय्य हक्कासाठी लढा देऊ.
-धनराज चौरे, पीडित तरूणाचे काका, तुमसर.