भाजपच्या पहिल्या यादीत भंडारा जिल्हा ‘वेटिंग’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 06:00 AM2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:28+5:30
विधानसभा निवडणुकीने जिल्ह्याचे वातावरण तापले आहे. नामांकनाला प्रारंभ झाला आहे. मात्र भाजपसह कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. सर्वांचे लक्ष विविध पक्षांच्या उमेदवारी घोषणांकडे लागले आहे. अशातच मंगळवारी भाजपने १२५ जणांची पहिली यादी घोषीत केली. मात्र या यादीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली यापैकी एकाही मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १२५ जणांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत भंडारा जिल्ह्यातील तीन पैकी एकाही मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे इच्छूकांचा हिरमोड झाला असून उत्सूकता शिगेला पोहचली आहे. आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा असून कुणाला उमेदवारी मिळते यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीने जिल्ह्याचे वातावरण तापले आहे. नामांकनाला प्रारंभ झाला आहे. मात्र भाजपसह कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. सर्वांचे लक्ष विविध पक्षांच्या उमेदवारी घोषणांकडे लागले आहे. अशातच मंगळवारी भाजपने १२५ जणांची पहिली यादी घोषीत केली. मात्र या यादीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली यापैकी एकाही मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश नाही. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीसाठी काही महिन्यांपासून प्रयत्न करणाऱ्यांचा हिरमोड झाला. मात्र दुसºया यादीची प्रतीक्षा कायम आहे.
युतीत जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. तीनही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तीनही आमदार तिकीटासाठी इच्छूक असून त्यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मात्र आता यापैकी कुणाची तिकीट कटणार आणि कुणाला मिळणार याची मोठी उत्सूकता आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रात भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे यांच्यासह नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, अरविंद भालाधरे इच्छूक आहेत. आता यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते की वेळेवर नवीनच नाव पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुमसर विधानसभा मतदार संघातही उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच दिसत आहे. विद्यमान आमदार चरण वाघमारेसह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या नावाची चर्चा आहे. येथे कुणाला उमेदवारी मिळते यावर तर्कवितर्क लावले जात आहे. साकोली विधानसभा मतदार संघात भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. विद्यमान आमदार बाळा काशीवार यांच्यासह मिलिंद टिचकुले, प्रकाश बाळबुद्धे, भोजराज कापगते आणि अविनाश ब्राम्हणकर यांची नावे चर्चेत आहेत.
मात्र पहिल्या यादीत कुणाचेही नाव आले नाही. त्यामुळे उत्सूकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसात उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
भंडारात काँग्रेस इच्छुक संभ्रमात
आघाडीत भंडारा विधानसभा मतदारसंघ पीरिपाच्या कवाडे गटाला तिकीट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गत काही दिवसांपासून काँग्रेसच्या तिकीटासाठी आस लावून बसलेल्या इच्छूकांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. बाहेरील उमेदवाराला येथे उमेदवारी दिल्यास काँग्रेसचा गट नाराज होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे काही जण तर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही आघाडीने या मतदारसंघाबाबत कोणताच निर्णय घेतला नाही.