भंडारा अग्निकांड बळींची संख्या पोहोचली 11 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:54 AM2021-02-08T05:54:10+5:302021-02-08T05:54:27+5:30
नागपुरात ‘रेफर’ केलेल्या एका बालकाचा मृत्यू
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडात अत्यवस्थ असलेल्या एका बालकाचा नागपूर येथे शुक्रवारी मृत्यू झाला. भंडारा तालुक्यातील कोका येथील सोनू मनोज मारबते यांचे ते बाळ होते.
मारबते यांच्या बालकाची तब्येत अत्यवस्थ असल्याने त्याला १६ जानेवारी रोजी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने १ फेब्रुवारीला घरी रवानगी करण्यात आली होती. मात्र चार दिवसात प्रकृती पुन्हा खालावली. सतत रडत असल्याने त्याला पुन्हा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले.
१६ जानेवारी रोजी या बालकाला नागपूरला हलविण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी ५ फेब्रुवारीला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. तपासणीनंतर बालकाला मृत घोषित करण्यात आले.
- डॉ. पीयूष जक्कल,
जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा
बालकाला ‘मिल्क ॲसपिरेशन सिंड्रोम’चा आजार
अग्निकांडातून वाचलेल्या बाळांवर उपचार सुरू होते. त्यापैकीच मारबते या दाम्पत्याचा बालकही सहभागी होता. बालकाला श्वास घ्यायला त्रास होता, तर त्याच्या डोळ्यातून सतत पाणी यायचे. शरीरात कार्बनची मात्रा असल्यामुळे श्वसन संस्थेत त्रास होता. त्याला ‘मिल्क ॲसपिरेशन सिंड्रोम’चा आजार असल्याचे सांगण्यात येत आहे.