भंडारा अग्निकांड : पाेलीस महासंचालकांकडून भंडारा जिल्हा रुग्णालयाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 08:20 PM2021-01-23T20:20:47+5:302021-01-23T20:21:50+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाच्या उच्चस्तरीय चाैकशी समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी शनिवारी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाच्या उच्चस्तरीय चाैकशी समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी शनिवारी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांसह सात जणांवर कारवाई झाली आहे. आता पाेलीस महासंचालकांच्या भेटीनंतर या प्रकरणात पाेलीस कारवाई हाेणार काय याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला नऊ जानेवारीच्या पहाटे अग्नितांडवात दहा बालकांचा बळी गेला हाेता. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली.
उच्चस्तरीय चाैकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीचा अहवाल गुरुवारी शासनाला सादर करण्यात आला. त्यावरून सात जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, शनिवारी दुपारी ४ वाजता राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली.
एसएनसीयू कक्षासह रुग्णालयाच्या बाहेरील परिसराचे त्यांनी निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासाेबत जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पीयूष जक्कल आदी उपस्थित हाेते. यानंतर पाेलीस महासंचालक थेट जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालयात पाेहाेचले. तब्बल दाेन तास त्यांनी येथे अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केली. या बैठकीत नेमके काय झाले याबाबत माहिती उपलब्ध हाेऊ शकली नाही. दरम्यान, पाेलीस महासंचालकांच्या भेटीनंतर या प्रकरणात पाेलीस कारवाई हाेणार काय अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे. तूर्तास याप्रकरणी भंडारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद असून, पाेलिसांचा तपास सुरू आहे. मात्र अहवालानंतर तीन दिवस झाले तरी या प्रकरणात काेणतीही रितसर तक्रार झाली नाही.