Bhandara: पैशासाठी मित्रानेच केला मित्राचा घात, दोन दिवसांनंतर सापडले आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 07:41 PM2023-03-24T19:41:18+5:302023-03-24T19:41:36+5:30
Crime News: भंडारा जिल्ह्यातील रामपूर (ता. मोहाडी) येथे पैशाच्या वादातून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृताचे नांव प्रदीप लक्ष्मण धांडे (३७, रामपूर-मांडेसर) असे आहे.
मोहाडी - भंडारा जिल्ह्यातील रामपूर (ता. मोहाडी) येथे पैशाच्या वादातून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृताचे नांव प्रदीप लक्ष्मण धांडे (३७, रामपूर-मांडेसर) असे आहे.
हिवराज फुलचंद बनकर (३६) आणि अनमोल पांडुरंग निंबुळकर (२८) अशी आरोपींची नावे आहेत. हिवराज बनकर हा प्रदीपचा बालपणीचा मित्र आहे तर अनमोल निंबुळकर हा अलिकडे झालेला मित्र आहे. या दोघांकडूनही प्रदीपने काही रक्कम उसनवारी घेतली होती. ती रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू असल्याने त्याचा गेम करण्याचे या दोघांनी ठरविले होते. प्रदीप दररोज शेतावरून गाईचे दूध घेऊन सायंकाळी गावात घेत असे. ही संधी साधून २२ मार्चला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास काळोख पसरल्याचा फायदा घेऊन त्याच्या डोक्यावर वार करून संपविले. रात्रीपर्यंत प्रदीप घरी न परतल्याने शोधाशोध केली असता रात्री उशिरा शेतातच त्याचा मृतदेह गवसला.
दरम्यान पोलिसांनी दोन दिवस शोध घेऊन संशयावरून शुक्रवारी दुपारी हिवराज बनकर आणि अनमोल निंबुळकर यांना ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिल्यावर दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.