भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरण : लाखनी पोलिसांच्या हलगर्जीपणाची एसडीपीओंकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 03:38 PM2022-08-08T15:38:35+5:302022-08-08T15:39:17+5:30
पीडित महिला ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप
भंडारा : गोंदिया जिल्ह्यात अत्याचार केल्यानंतर नराधमांनी महिलेला रस्त्यात सोडून दिले. त्यानंतर ती लाखनी पोलीस ठाण्यात पोहोचली; मात्र पोलिसांनी कोणतीही विचारपूस न करता रात्रभर ठाण्यात बसवून ठेवले. त्यातच ती पहाटेच्या सुमारास निघून गेली आणि दुसऱ्यांदा अत्याचार झाला. लाखनी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे दुसऱ्यांदा अत्याचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला. याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी चौकशीचे आदेश दिले.
भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. घरगुती वादातून रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना जिल्ह्यातील कारधा ठाण्याच्या हद्दीत कान्हाळमोह येथे २ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून आता प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पळसगावच्या जंगलात अत्याचार केल्यानंतर तिला नराधमांनी लाखनी ठाण्याच्या हद्दीत सोडून दिले. ती पायी जात असताना मुरमाडीच्या महिला पोलीस पाटलांनी तिची विचारपूस केली. ११२ वर फोन करून तिला लाखनी ठाण्यात पाठविले; मात्र ठाण्यात तिची योग्य चौकशी केली नाही. रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. पहाटेच्या सुमारास ती ठाण्यातून निघून गेली आणि भंडारा जिल्ह्यातील कान्हाळमोह येथे पुन्हा अत्याचार झाला. लाखनी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे दुसऱ्यांदा अत्याचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला. यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण आले असून पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी या आरोपांची चौकशीचे आदेश दिले.
दोषींवर कारवाई होणार - पोलीस अधीक्षक मतानी
शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपाची जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. लाखनी ठाण्यात नेमके काय घडले याची चौकशी करण्याचे आदेश सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांना देण्यात आले आहेत. चौकशीला प्रारंभ झाला असून चौकशी अंती दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक मतानी यांनी सांगितले.