भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरण; ४० दिवसांत सातशे पानांचे आरोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 10:44 AM2022-09-15T10:44:56+5:302022-09-15T10:54:00+5:30

कारधा गुन्ह्यात ‘एसआयटी’ तपास पूर्ण; आता फास्ट ट्रॅकचे प्रयत्न

Bhandara Gang Rape Case; Seven hundred pages of charge sheet filed in 40 days | भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरण; ४० दिवसांत सातशे पानांचे आरोपपत्र दाखल

भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरण; ४० दिवसांत सातशे पानांचे आरोपपत्र दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकरण सत्र न्यायालयात

भंडारा : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भंडारा-गोंदिया सामूहिक अत्याचार प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) अवघ्या ४० दिवसांत भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी सायंकाळी ७०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. १ ऑगस्ट रोजी भंडारा तालुक्यातील कन्हाळमोह परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचाराचे प्रकरण पुढे आले होते. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाण्याची शक्यता आहे.

लुक्का उर्फ अमित अशोक सार्वे (३०, रा. गुंथारा, ता. भंडारा) आणि मोहम्मद एजाज मोहम्मद वाहीद अन्सारी (२५, रा. डव्वा, ता. भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील या महिलेवर गोंदिया जिल्ह्यात आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह परिसरात सामूहिक अत्याचार केल्याची घटना २ ऑगस्ट राेजी उघडकीस आली. या प्रकरणी प्रथम कारधा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आराेपींविराेधात शून्य तक्रारीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लुक्का आणि मोहम्मद या दोघांना अटक करण्यात आली. नंतर प्रकरण कारधा पोलिसांनी गोंदिया पोलिसांकडे हस्तांतरित केले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानंतर आयपीएस अधिकारी रागासुधा आर. यांच्या नेतृत्वात पथक स्थापन झाले. या पथकाने तांत्रिक सर्व बाबी समजून घेत तपास केला. तपासात गोंदिया जिल्ह्यात झालेला अत्याचार आणि भंडारा जिल्ह्यात झालेला अत्याचार वेगवेगळे असून आरोपी वेगवेगळे आहेत, असा निष्कर्ष काढून भंडारा तालुक्यातील कारधा ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला.

तर यापूर्वीच्या घटनेचा गुन्हा गाेरेगावमध्ये दाखल आहे. त्या प्रकरणातील आराेपी अद्यापही पसार आहेत. ताे ट्रकचालक असून आतापर्यंत एसआयटीने असंख्य ट्रकचालकांची ओळख परेड घेतली. परंतु खऱ्या आराेपींपर्यंत पाेहाेचणे, पाेलिसांसमाेर आव्हान आहे. असे असले तरी एसआयटीने तत्परता दाखवीत परिपूर्ण तपास केला. संपूर्ण राज्यभर हे प्रकरण चांगलेच गाजले हाेते. राजकीय महिला नेत्यांनीही नागपूर मेडिकलमध्ये पीडितेची भेट घेऊन प्रकरण गंभीर असल्याने आराेपांच्या फैरी झाडल्या हाेत्या. आता आराेपपत्र दाखल झाल्याने सर्व लक्ष न्यायालयीन प्रक्रियेकडे असणार आहे.

सामूहिक अत्याचार प्रकरणात भंडारा न्यायालयात आराेपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण तातडीने निकाली लागून आराेपींना कठाेर शिक्षा व्हावी, यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅक काेर्टात चालविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

- रागासुधा आर., प्रमुख, विशेष तपास पथक

Web Title: Bhandara Gang Rape Case; Seven hundred pages of charge sheet filed in 40 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.