राजपथावर पथसंचलनात भंडाऱ्याच्या सुषमाने केले महाराष्ट्राचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:05 AM2018-01-27T11:05:26+5:302018-01-27T11:05:57+5:30
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारला दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या सैन्य दलाच्या पथसंचलनात भंडारा जिल्ह्यातील सुषमा शिवशंकर कुंभलकर या २६ वर्षीय तरूणीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
नंदू परसावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारला दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या सैन्य दलाच्या पथसंचलनात भंडारा जिल्ह्यातील सुषमा शिवशंकर कुंभलकर या २६ वर्षीय तरूणीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. सुषमाला मिळालेली ही संधी भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात सुषमाचा जन्म झाला. आईवडील, दोन भाऊ आणि सुषमा असे पाचजण असलेल्या कुंभलकर कुटुंबाची उपजीविका ही रोजमजुरीवर आहे. अशातच बालपणापासूनच सैन्यात जाण्याची आवड असल्यामुळे सुषमाने पहिल्यांदा धावण्याची आवड स्वत:मध्ये निर्माण केली. पुढे हीच आवड सैन्यात जाण्यासाठी प्रेरणादायी ठरली. प्राथमिक शिक्षण बेटाळा जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालय बेटाळा, महाविद्यालयीन शिक्षण नवप्रभात महाविद्यालय वरठी त्यानंतर भंडारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात निघाली. तिथे रांजणगाव येथे नोकरी करीत असताना मित्रमैत्रिणीकडून सैन्यात जाण्याची माहिती घेत राहिली. सैन्यात जाण्याची आवड स्वस्थ बसू देत नसल्यामुळे ड्युटी करून घरी परतल्यानंतर ती शारीरिक व्यायाम व लेखी परीक्षेचा रात्रंदिवस अभ्यास करीत होती. ती २०१४ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची उतीर्ण झाली.
जिथे जाण्यासाठी तरूणही एकाएकी धजावत नाही, अशा ‘बीएसएफ’मध्ये तिची निवड झाली. आणि उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करून तिने आपले स्वप्न सार्थ ठरविले. आज ती राजस्थान राज्यात बिकानेर येथील १६ बीएन सेक्टरमध्ये कार्यरत आहे. ग्वाल्हेरमधील टेकानपूर बीएसएफ कॅम्पमध्ये तिच्यासह ४७ मुलींना बुलेट स्टंटचे प्रशिक्षण दिले जात आहे. एका ग्रुपमध्ये ४८ मुलींमध्ये महाराष्ट्रातील तीन मुली आहेत. त्यात सुषमा कुंभलकर रा.भंडारा, विजेता भालेराव रा.अमरावती, जयश्री लांबट रा.चंद्रपूर यांचा समावेश आहे.