भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 08:14 PM2018-05-31T20:14:52+5:302018-05-31T20:15:06+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपविरूद्व राज्यभरात मोर्चाच उघडला होेता. जेव्हा केव्हा या पोटनिवडणुकीची घोषणा होईल तेव्हा पटोलेंचा अहंभाव उतरविण्याचा चंग राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपने बांधला होता. परंतु, पायाला भिंगरी बांधल्यागत प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांनी दोन्ही जिल्हे पिंजून काढले. आणि मधुकर कुकडे यांच्या रूपाने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला विजय मिळवून दिला.
नंदू परसावार / अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपविरूद्व राज्यभरात मोर्चाच उघडला होेता. जेव्हा केव्हा या पोटनिवडणुकीची घोषणा होईल तेव्हा पटोलेंचा अहंभाव उतरविण्याचा चंग राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपने बांधला होता. परंतु, पायाला भिंगरी बांधल्यागत प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांनी दोन्ही जिल्हे पिंजून काढले आणि मधुकर कुकडे यांच्या रूपाने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला विजय मिळवून दिला.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जागा वाटपाच्या सुत्रानुसार राष्ट्रवादी व काँग्रेसनेही या जागेवर दावा केला होता. मात्र ही जागा कुणाला मिळेल यावर बरीच खलबते झाली. अखेर प्रफुल्लभाईनी ही जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणली. त्याचवेळी या उमेदवारीवर दावा करणारे नाना पटोले यांनी ही जागा राष्ट्रवादीला मिळाली असली तरी विजयाची जबाबदारी आपल्यावर आहे, असे सांगून पहिल्या दिवसापासून मतदार संघाची बांधणी करण्यासाठी सरसावले होते. अशातच राष्ट्रवादीचा पराभव नव्हे तर पटोलेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भाजपने सहाही विधानसभेत १८० विस्तारक नेमले होते. याशिवाय राज्यातील मंत्र्यांच्या प्रचारसभा घेतल्या. परंतु वाढती महागाई, शेतकºयांचा आक्रोश, मोदींनी दिलेल्या आश्वासनांची खैरात आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि अखेरच्या टप्प्यात ईव्हीएमचा झालेला घोळ याच मुद्यांमुळे मतदारांनी भाजपला सपेशल नाकारले.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे पाच आमदार आहेत. यात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हेही याच मतदार संघातील असून त्यांच्या सोबतीला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे भंडाराचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही गोंदिया विधानसभा क्षेत्र वगळता तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनीमोरगाव आणि तिरोडा या पाचही विधानसभा क्षेत्रात भाजप मतांच्या आघाडीत माघारला आहे. याशिवाय भंडारा, तुमसर, साकोली, तिरोडा या नगर परिषदमध्येही भाजपची सत्ता आहे. परंतु विकासाचा स्थानिक मुद्दा भाजपकडे नव्हता. याशिवाय मागील निवडणुकीत पटेलांचा पराभव केलेले पटोले हे आता काँग्रेसवासी झाल्याने त्यांच्यात ‘दिलजमाई’ झाली. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक एकदिलाने लढली. आम्ही आता एक झाले आहोत त्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्याला विकासापासून कुणीही रोखू शकणार नाही, अशी भावनिक साद पटेल-पटोले या दोन्ही नेत्यांनी मधुकर कुकडे यांच्या उमेदवारीची घोषणा करताना घातली होती. ही भावनिक साद मतदारांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरली. आणि याच विश्वासाचे फलित मधुकर कुकडे यांच्या विजयात झाले. यासोबतच भाजपच्या नेत्यांना अतिआत्मविश्वास नडल्यामुळे हेमंत पटलेंना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी नाना पटोले यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे छाती ठोकून सांगणाऱ्यांना कोणता संदेश द्यायचा आहे, ते जनतेने मतपेटीतून दाखवून दिले.