भंडारा-गोंदियात ११ एप्रिलला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 09:47 PM2019-03-10T21:47:53+5:302019-03-10T21:48:21+5:30
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच राजकीय वातावरण तापले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २५ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच राजकीय वातावरण तापले आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणुकीची अधिसूचना १८ मार्च रोजी जारी केली जाणार आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून २६ मार्च रोजी नामांकन अर्जांची छाणनी केली जाईल. तर २८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. ११ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. गत काही दिवसांपासून निवडणुकीच्या घोषणेची उत्सुकता लागली होती. रविवारी सायंकाळी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार भंडारा-गोंदिया मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २० लाख ५२ हजार ६१४ मतदार आहेत. आदर्श आचार संहिता रविवारपासून लागू झाली आहे. जिल्ह्यात ईव्हीएमसह व्हीव्हीपॅड मशीन पुरेशा असून सर्व मशीनची तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
भंडारा जिल्ह्यात ९ लाख ७७ हजार ६१४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यात १२ हजार ९३७ नवमतदार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२०६ मतदान केंद्र असून ईव्हीएम पुरेशी असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्रासह आयोगाने ठरवून दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. फोटो व्होटर स्लिप ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव असने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघात वाढले ४ लाख मतदार
गत लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा चार लाख ९२८ मतदारांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १६ लाख ५१ हजार ६८६ मतदार होते. यंदा २० लाख ५२ हजार ६१४ मतदारांची नोंद झाली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढल्याने निवडणूक विभागाने जारी केलेल्या मतदान यादीवरुन दिसून येत आहे.
आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी
आदर्श आचार संहिता लागू झाली असून त्याची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंगाबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकृत अॅपवर तक्रार दाखल करता येईल, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारासाठी खर्च मर्यादा ७० लाख रुपये असून जिल्हा निवडणूक विभाग प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.