तरूणांत उत्साह! दिव्यांग, वृद्धांना मदतीचा हात; नवमतदारांचे सोशल मीडियावरून मतदानाचे आवाहन
By युवराज गोमास | Published: April 19, 2024 01:47 PM2024-04-19T13:47:59+5:302024-04-19T13:49:04+5:30
ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट उभारून मतदारांना केंद्रावर येण्यासाठी प्रशासनाने प्रेरित केले
भंडारा: रखरखत्या उन्हाची पर्वा न करता यंदाची निवडणूक शहरांसोबत ग्रामीण तरूणांनी डोक्यावर घेतली. नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकत इतरांना मतदानाचे आवाहन केले. तरूणांनी दिव्यांग व अपंगांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व्हिलचेअरचा आधार दिला. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर पोलिस, होमगार्ड, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस पाटील, कोतवाल, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी तैनातीला होते.
केंद्रावर थंड पाण्याची सुविधा पुरविण्यात आली. ठिकठिकाणी प्रशासनाने सेल्फ़ी पॉईंट उभारून मतदारांना केंद्रावर येण्यासाठी प्रेरीत केले. मतदारांना घरोघरी चिठ्ठ्यांचे वितरण झाल्यानंतरही अनेक राजकीय पक्षांच्या बुथवर जावून मतदारांनी आपली चिठ्ठी घेण्यासाठी गर्दी केली होती. भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री चौकातील एका बुथवर नागरिकांनी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास अशी गर्दी दिसून आली. दुपारपर्यंत मतदान शांततेत सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले.