'कृषी हब'साठी भंडारा बाजार समितीला हवाय १५२ कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:56 IST2025-01-13T11:55:12+5:302025-01-13T11:56:29+5:30
Bhandara : विकास आराखडा मंजुरीसाठी पुणे येथील पणन संचालकांच्या दालनात

Bhandara Market Committee needs Rs 152 crore for 'Agricultural Hub'
युवराज गोमासे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कृषी उत्पन्न बाजार समिती दुरवस्थेची कात टाकण्यास आसुसली आहे. सभापती व समिती संचालकांनी 'कृषी हब' विकासाचा नवा रोडमॅप तयार केला आहे. भरारीला बळ देणारा १५२ कोटी ४४ लाख ८६ हजार ६७३ रुपयांचा नवा आराखडा २० मार्च २०२४ रोजी पुणे येथील पणन संचालकांच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. आता प्रतीक्षा आहे ती समितीला विकासाचे नवे पंख मिळण्याची.
भंडारा बाजार समिती २९ डिसेंबर १९६० रोजी अस्तित्वात आली. परंतु, सध्या चोहोबाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे अधोगतीला आली आहे. पर्याप्त पार्किंग सुविधांचा अभाव आहे. शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ही दुरवस्था संपविण्यासाठी सभापती विवेक नखाते, उपसभापती नामदेव निंबार्ते, संचालक शरद मेश्राम, हितेश सेलोकर, नरेंद्र झंझाड, विनोद थानथराटे, भगवान बावणकर, जयराम वंजारी, विजय लिचडे, रमाबाई भुरे, पुष्पमाला मस्के, रामलाल चौधरी व सचिव सागर सार्वे यांनी पुढाकार घेतला आहे.
नऊ एकर जागेसाठी भरले २.७५ कोटी
सन २००८ मध्ये मिलेवाड्याजवळ नवा व जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध असलेली गटक्रमांक ९४/१ मधील ३.६० हेक्टर आर (९ एकर) जागेची मागणी तत्कालीन संचालक मंडळाने शासनाकडे केली होती. २७ एप्रिल २०२१ रोजी २ कोटी ७५ लाख ५० हजार ४०० रुपये शासन निधी भरून ही जागा ताब्यात घेतली आहे.
भिलेवाड्यात सुरु होणार उपमार्केट यार्ड
भिलेवाडा येथे दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी विदर्भातील सुसज्ज असे मार्केट यार्ड तयार करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. शेतमालाच्या खरेदी- विक्रीसाठी तसेच अन्य मालाच्या नियमनासाठी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी जय किसान उपमार्केट यार्ड भिलेवाडा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
विकास आराखड्यात राहणार अशा सुविधा
विकास आराखड्यात महामार्गाला लागून पेट्रोल, शेतकरी निवासस्थान व कॅन्टीन, दीड एकरात फळे व भाजीपाला मार्केट, लिलावगृह, दीड एकरात जनावरांचा बाजार, दीड एकरात वाहनांची पार्किंग, वेस्टेज शेतमालापासून कंपोस्ट खतनिर्मिती, सोलर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंग, मछली मार्केट, ५ हजार मेट्रिक टन क्षमतेची तीन गोडावून, शीतगृह, प्रशस्त प्रशासकीय इमारत व कंपाऊंड, रस्ते व पाणी सुविधा तसेच अन्य सुविधांची उभारणी होणार आहे.