भंडारा हत्याकांड प्रकरण : आणखी चौघांना अटक; दोन्ही गटांत अटकेतील आरोपींची संख्या १४ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:52 PM2023-06-01T16:52:10+5:302023-06-01T16:52:27+5:30
समेटासाठी आलेल्या अभिषेकने चाकू आणला कशासाठी?
भंडारा : रविवारी रात्री अभिषेक आपल्या मित्रांसह समेटासाठी अमनच्या लस्सी सेंटरवर आला होता. मात्र, समेटासाठी येताना त्याने चाकू आणला कशासाठी, असा नवा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. यामुळे आता अभिषेक आणि त्याच्या सोबत्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, बुधवारी पोलिसांनी पुन्हा दोन्ही गटांमधील चार आरोपींना अटक केली. यात, अमनच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या बा ऊर्फ विष्णू वासनिक आणि विक्की मोगरे या दोघांना अटक केली, तर अभिषेकला मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी मृत अमनचे काका किरण नंदूरकर आणि धीरज नंदूरकर या दोघांना अटक केली आहे. आजच्या कारवाईमुळे या घटनेतील अटक झालेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे. काल अटक करण्यात आलेल्या १० जणांना बुधवारी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. त्यांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
भंडारा हत्याकांड प्रकरण : काकाला थापड मारल्याने अमनला आला होता राग
चाकू जप्त
अमनच्या हत्येसाठी अभिषेकने वापरलेला चाकू पोलिसांनी घटनेच्या दिवशीच जप्त केला आहे. अभिषेकने अमनच्या उजव्या कुशीखाली एकच वार केला होता. तो बराच खोलवर असल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला होता. तो चाकू अभिषेकचाच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी वाढण्याची शक्यता
या घटनेतील आरोपींची संख्या १४ झाली असली तरी ही संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांनी सांगितले. या घटनेचा तपास अधिक बारकाईने केला जात असून, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासली जात असल्याचे त्यांनी सांगितले.