स्वच्छ भारत अभियानात भंडारा नगरपरिषदेचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:52+5:30
स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मंत्र देत संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भंडारा नगरपरिषदही या अभियानात सहभागी झाली आहे. ही स्पर्धा तब्बल सहा हजार गुणांची असून विविध उपक्रमांवर गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची चमू प्रत्यक्ष पाहणीही करीत आहे. भंडारा नगरपरिषदेने या उपक्रमात भाग घेत स्वच्छतेसाठी विविध उपाय योजले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील विविध शहरे सहभागी झाले असून त्यात भंडारा नगरपरिषदेचाही समावेश आहे. सध्या या अभियानांतर्गत शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरु असून अॅपद्वारे होणाऱ्या या सर्वेक्षणाला नागरिकांच्या प्रतिसादाची गरज आहे.
स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मंत्र देत संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भंडारा नगरपरिषदही या अभियानात सहभागी झाली आहे. ही स्पर्धा तब्बल सहा हजार गुणांची असून विविध उपक्रमांवर गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची चमू प्रत्यक्ष पाहणीही करीत आहे. भंडारा नगरपरिषदेने या उपक्रमात भाग घेत स्वच्छतेसाठी विविध उपाय योजले जात आहेत. मात्र या अभियानाला यशस्वी करण्यासाठी आणि स्पर्धेत पुरस्कार मिळविण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.
नगरपरिषदेने केलेल्या स्वच्छताविषयक कामांबाबद नागरिकांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी अतिशय महत्वाचा आहे. या स्पर्धेत प्रतिसादाला ४०० गुण दिले जाणार आहे. अॅपद्वारे आठ प्रश्नांची उत्तरे नागरिकांना द्यावयाची आहे. स्वच्छतेवर आधारित असलेल्या प्रश्नांना १ ते १० क्रमांकात गुण द्यावयाचे आहे. शहराच्या लोकसंख्येच्या १५ टक्के नागरिकांचा या स्पर्धेसाठी सहभाग हवा आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी त्यासाठी नागरिकांत जनजागृती करीत आहेत.
नगरपरिषदेच्या वतीने त्यासाठी जनजागृती केली जात आहे. अॅप आणि संकेतस्थळावरून नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरु आहे. नागरिकांनी ३१ जानेवारीपर्यंत अॅप अथवा पोर्टलवर आपला अभिप्राय नोंदवावा. यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी शहरात फिरून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.
-ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी