भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर बाजार समिती निवडणुकीत १४७ नामांकन मागे
By युवराज गोमास | Published: April 20, 2023 06:16 PM2023-04-20T18:16:18+5:302023-04-20T18:17:00+5:30
काँग्रेस समर्थित पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनल मैदानात
भंडारा : जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत नामाकंन मागे घेण्याच्या (२० एप्रिल) शेवटच्या दिवशी १४७ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. यामुळे चारही बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस समर्थीत पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना शिंदे गट समर्थीत पॅनल निवडणुकीच्या मैदानात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्येकी १८ संचालकांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या दबावात चारही बाजार समित्यांमध्ये एकूण १४७ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून काँग्रेस समर्थीत पॅनल व राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे.
भंडारा बाजार समितीत एकूण ७६ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६५ वैध ठरले. तर शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. नाामांकन मागे घेतलेल्यांमध्ये सेवा सहकारी संस्था गटातून १८ उमेदवारांनी, ग्रामपंचायत गटातून ७, अडत्या-व्यापारी गटातून ३ तर हमाल-मापारी गटातून एका उमेदवाराचा समावेश आहे. ३६ उमेदवार शिल्लक राहिल्याने काँग्रेस समर्थीत शेतकरी सहकार पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित शेतकरी एकता पॅनलमध्ये मुकाबला रंगणार आहे.
पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालक पदासाठी ८९ उमेदवार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८० वैध ठरले. शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. ३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. येथे काँग्रेस समर्थीत पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे. लाखनी बाजार समितीत १८ संचालक पदासाठी ९२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८९ वैध ठरले. शेवटच्या दिवशी ५० उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. ३९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. येथे काँग्रेस समर्थीत पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनलमध्ये मुख्य मुकाबल होणार आहे.
लाखांदूर बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ५७ वैध ठरले. शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. ३२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. येथेही काँग्रेस समर्थीत पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे.