नागपूरच्या महोत्सवात भंडाऱ्याचा तांदूळ
By admin | Published: January 16, 2017 12:30 AM2017-01-16T00:30:57+5:302017-01-16T00:30:57+5:30
नागपूरच्या कृषि महाविद्यालय परिसरात कृषिविद्या विभागात आत्मा भंडारा व नागपूरच्यावतीने आयोजित तांदुळ व संत्रा महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले.
२७.५० लाखांचे तांदूळ विक्री : हिराणखी वाणास शंभर रूपयांचा दर
भंडारा : नागपूरच्या कृषि महाविद्यालय परिसरात कृषिविद्या विभागात आत्मा भंडारा व नागपूरच्यावतीने आयोजित तांदुळ व संत्रा महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले. यापैकी सेंद्रीय शेतीच्या १८ गटाच्या ५५० शेतकऱ्यांनी महोत्सवात सहभाग नोंदवून ३४ टन तांदळाची विक्री केली.
या महोत्सवास नागपूर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. तांदुळ व संत्रा महोत्सवात आत्मा भंडारा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी बचतगटांनी उत्पादित केलेल्या सेंद्रीय तांदळाचे विविध वाण व इतर शेतमालाची विक्री हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. यात भंडारा जिल्ह्यातून लुप्त झालेले हिरानखी, सुगंधीत चिन्नोर, जयश्रीराम प्रणाली, केशर हे वाण ग्राहकांच्या पसंतीचे ठरले. भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील भदुजी कायते यांनी उत्पादित केलेल्या हिरानखी या सुगंधित तांदळाच्या वाणाला ८० ते १०० रूपये प्रती किलोग्रॅम दर मिळाला. या वाणसाठी अनेक ग्राहकांनी पुढील वर्षासाठी अग्रिम बुकींग करून घेतले.
या तांदुळ महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. या ३० गटांपैकी १८ गट हे परंपरागत कृषि विकास योजनेंतर्गत तयार करण्यात आलेले सेंद्रीय शेती क्लस्टर असून उर्वरित गट हे जिल्ह्यातील आत्मांतर्गत तयार करण्यात आलेले सेंद्रीय शेती उत्पादने तयार करणारे आहेत. महोत्सवासाठी भंडारा व नागपूर येथील आत्माचे प्रकल्प संचालक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका निभावली. (जिल्हा प्रतिनिधी)
५५० शेतकऱ्यांचा सहभाग
या तांदूळ महोत्सवात ५५० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सेंद्रीय शेतमालाची विक्री केली. यात ३४ टन तांदूळ, ७० क्विंटल गुळ, २० क्विंटल हळद, ४ क्विंटल तीळ, ९ क्विंटल विविध प्रकारच्या डाळी, जवस तेल, मोहरी, धने, मिरची पावडर, गहू, मशरूम, सीताफळ अशा विविध प्रकारची शेती उत्पादनांची २७.५० लाख रूपयांची विक्री करण्यात आली.