शैक्षणिक सहलीतून भंडारा एसटी महामंडळाने कमविले ५०.४५ लाखाचे उत्पन्न; विद्यार्थ्यांना मिळाली सवलत
By युवराज गोमास | Published: February 3, 2024 02:22 PM2024-02-03T14:22:09+5:302024-02-03T14:22:24+5:30
साकोली आगाराने केली सर्वाधिक कमाई
भंडारा : शैक्षणिक सहलीतून भंडारा एसटी महामंडळाने जानेवारी व डिसेंबर महिन्यात ५० लाख ४५ हजार ३६८ रूपयांची कमाई केली. कमाईच्या बाबतीत साकोली आगार अव्वल राहीला. महामंडळाचेवतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी घसघसीत सुट दिली जाते. शिवाय सुरक्षीत प्रवाशाची हमी मिळत असल्याने शैक्षणिक सहलींसाठी जिल्ह्यात एसटीलाच सर्वाधिक पसंती मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
जिल्ह्यात जिल्हा परिषदसह खासगी संस्थांच्या शाळा व महाविद्यालयाकडून डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यात शैक्षणिक सहलींचे आयोजन पार पडते. विद्यार्थ्यांना साचेबंद शिक्षणाशिवाय थेट पाहणीतून शिकता यावे, सामान्यज्ञान वाढावा, दैनदिन शिक्षणातून कंटाळा दूर व्हावा, मनोरंजनाबरोबर नवनवे ठिकाण पाहण्याचा अनुभव घेता यावा, हा शैक्षणिक सहलींच्या आयोजनाचा मुख्य हेतू असतो.
भंडारा एसटी महामंडळाचा कारभार दोन जिल्ह्यातून चालतो. यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी आदी सहा आगारांचा समावेश आहे.
भंडारा महामंडळाच्या सहा आगारातून डिसेंबर २०२३ या महिन्यात शैक्षणिक सहलींसाठी १३९ बससेवा उपलब्ध करण्यात आल्या. १३९ बसेसनी ६७ हजार ८ किमीचा प्रवास करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घडविली. यातून महामंडळाला सुमारे २० लाख ४४ हजार ७७७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जानेवारी २०२४ या महिन्यात विविध शाळांच्या माध्यमातून २५३ बसेस बुक करण्यात आल्या. या बसेसनी सुमारे १ लाख १ हजार २ किमीचा प्रवास करून विद्यार्थ्यांना विविध पर्यटनस्थळी पोहचविले. यातून एसटी महामंंडळाची ३० लाख ५९१ रूपयांची कमाई झाली.
शैक्षणिक सहलीसाठी एसटीलाच पसंती
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक सहलींच्या आयोजनासाठी एसटी महामंडळाच्या गाड्यांनाच पसंती दिली जात आहे. गत अनेक वर्षांपासून हे चित्र स्पष्टपणे जाणवत आहे. एसटी महामंडळ शालेय सहलींसाठी प्रासंगिक करारांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देत असल्याने खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचा प्रवास स्वस्त होत आहे. शिवाय अपघात विमा व अन्य सुविधांची हमी सुद्धा दिली जात आहे.
प्रवासाच्या किलोमिटरवर मिळते सवलत
शालेय सहलींसाठी एसटी महामंडळाकडून किलोमिटर अंतरानुसार सवलत दिली जाते. लालपरी ५५ किमी व सेमी लक्झरी बस ७२ किमी या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाते. सवलतींच्या रक्कमेची प्रतिपूर्ती शासनाकडून महामंडळाला केली जाते. ४४ प्लस ११ आसनी जागा एसटीत मिळतात. विशेष म्हणजे जीएसटी लावली जात नाही.
डिसेंबर महिन्यात मिळाले उत्पन्न
आगार बस संख्या उत्पन्न
भंडारा ४४ ५४५३२५
गोंदिया ०६ १८१९२७
साकोली ४८ ६५९४५५
तुमसर ३५ ४३३६७०
तिरोडा ०० ०००
पवनी ०६ २२४४००
एकूण १३९ २०४४७७७
जानेवारी महिन्यात मिळाले उत्पन्न
आगार बस संख्या उत्पन्न
भंडारा ८२ ६८२०००
गोंदिया २६ ३४४४२८
साकोली ५९ ७७५२२५
तुमसर ४३ ५७८६७५
तिरोडा ३२ ३३९४८८
पवनी ११ २८०७७५
एकूण २५३ ३०००५९१