भंडारा : तलाव उथळ, अतिक्रमणाचा विळखा; कसे वाढणार जलसिंचन?
By युवराज गोमास | Published: March 5, 2024 04:48 PM2024-03-05T16:48:25+5:302024-03-05T16:51:07+5:30
शेतकऱ्यांचा प्रश्न : तलावांचे खोलीकरण व अतिक्रमण निर्मुलन गरजेचे
भंडारा : जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १३१० आहे. शहरीकरण व गावांचा विस्तार झाल्याने काही तलाव आता नामशेष आहेत. त्यातच शेतशिवार व निसर्गाच्या सानिध्यातील तलावांनाही घरघर लागली आहे. वर्षांनुवर्षांपासून साचलेल्या गाळाने तलाव उथळ झाले आहेत. तलावांच्या पोटात अनेक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे तलावांची सिंचन क्षमता जेमतेम आहे. सातबारावर सिंचन सुविधेचा शेरा असला तरी सिंचनाचा अभाव दिसून येत आहे.
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी आदी सातही तालुक्यांत तलावांची संख्या मोठी आहे. परंतु, ही ओळख आता पुसट होत चालली आहे. डोंगर टेकड्याच्या सानिध्यात असलेले मोठे तलाव तग धरून आहेत. मात्र, शेतशिवारातील लहान तलाव केवळ हंगामी आहेत. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे या तलावांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच लोकसहभागाचा अभाव असल्याने स्थिती गंभीर झाली आहे. परिणामी तलावांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तलावांचे संवर्धनासाठी शासन-प्रशासनाच्या पुढाकाराची व लोकसहभागाची नितांत गरज आहे.
जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तलाव, बोड्यांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तलावांच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात सिंचनाचा व भूजलाचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो. तलाव सिंचनासोबत पशु-पक्षी आदींसाठी महत्वपूर्ण आहेत.
जलयुक्त शिवाराची व्याप्ती वाढवा
मागीलवेळी जलयुक्त शिवारातून अनेक तलावांचे खोलीकरण झाले. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. करडी येथील गोटाळी तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा पडायचा. आता खोलीकरणामुळे उन्हाळ्यात जलसाठा दिसून येतो. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे तलावांचे पुनर्जीवन शक्य आहे. गरज आहे ती योजनेची व्याप्ती वाढविण्याची.
तर ग्रामीण जलसंकट होणार दूर
तलाव जिवंत राहिल्यास कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल केले जाऊ शकतात. पाण्यामुळे ६० टक्के उत्पादकता वाढते. जनावरांच्या पिण्याचा तर मानवाच्या वापराच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. ग्रामीण जलसंकट यामुळे दूर केले जाऊ शकते. मरनासन्न तलावांची दुरुस्ती त्यासाठी आवश्यक आहे.
तलावांचे खोलीकरण व संवर्धन होणे मानवासह पशुपक्ष्यांसाठी आवश्यक आहे. यामुळे पाण्या दुर्भिक्षता संपूर्ण भूजलसाठा वाढेल. शेतीचे सिंचन वाढून पाणी टंचाई संपण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील.
हितेश सेलोकर, शेतकरी माटोरा.