दिवाळीच्या दिवशी तीन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू; गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 02:53 PM2020-11-14T14:53:18+5:302020-11-14T14:54:07+5:30
लाखांदूर तालुक्याच्या पुयार (चारभट्टी) जंगल तलावातील घटना
लाखांदूर(भंडारा):दिवाळी सणाच्या मुहूर्तावर परंपरेनुसार शेळ्या धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन सख्ख्या भावांचा एकमेकांना वाचवताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील पुयार (चारभट्टी) जंगलातील तलावात शनिवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली.
मधुकर नीलकंठ मेश्राम (45), सुधाकर नीलकंठ मेश्राम (43) व प्रदीप नीलकंठ मेश्राम (39) रा.पुयार अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी सकाळी ही तीन भावंडं आणि तुषार मधुकर मेश्राम (13) असे चार जण 100 शेळ्या मेंढ्यांना घेऊन धुण्यासाठी जंगलातील तलावावर गेले होते. प्रथम मधुकर हा काही शेळ्या मेंढ्यांसोबत तलावातील पाण्यात उतरला. मात्र तो पाण्यात बुडत असल्याचे सुधाकर नामक भावाला दिसले. त्याने भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र तोदेखील बुडताना दिसल्याने तिसरा भाऊ प्रदीपने पाण्यात उडी घेतली. तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांना वाचवताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान यावेळी घटनास्थळावर हजर तुषारने मोबाइलवरुन ही माहिती कुटुंबियांना माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेती. गावातीलच काही नागरिकांच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच सहाय्यक पोलिस निरिक्षक चहांदे यांच्यासह पोलिस नाइक दुर्योधन वकेकार, पोलिस अंमलदार संदीप रोकडे, अनिल साबळे, दशरथ सतिबावने, हुसेन नखाते आदींनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतले.
दिवाळीच्या दिवशीच गावातील एका गरीब कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण पुयार गावात शोककळा पसरली आहे.