ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात भंडारा विदर्भात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:47 AM2018-10-13T10:47:56+5:302018-10-13T10:49:38+5:30
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने करण्यात आलेल्या देशव्यापी ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात भंडारा जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने करण्यात आलेल्या देशव्यापी ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात भंडारा जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरावर १३ व्या स्थानी असलेल्या भंडारा शहराने स्वच्छतेत पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले आहेत.
देशभरातील जिल्ह्यांचे स्वच्छता गुणांकन ठरविणे, स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संपूर्ण देशात १ ते ३१ आॅगस्टपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात राज्यातील ३४ जिल्हे सहभागी झाले होते. भंडारा जिल्ह्यातील गावांचे सर्वेक्षण केंद्र सरकारच्या पथकाचे प्रमुख ईश्वर काटेखाये यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नऊ गावांना भेटी देऊन तपासणी केली. त्यात सार्वजनिक जागेवरील स्वच्छता, नागरिकांचे अभिप्राय, स्वच्छताविषयक सद्यस्थिती आदींचा समावेश होता. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच घोषित केला. त्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यात भंडारा जिल्ह्याला सर्वाधिक १०० पैकी ८६.९७ गुण मिळाले. प्रत्यक्ष तपासणीत ३० पैकी २६.९४ गुण, नागरिकांच्या प्रतिसादात ३५ पैकी २५.०३ गुण तर स्वच्छता विषयक सद्यस्थितीत ३५ पैकी ३५ गुण प्राप्त केले आहेत.
ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात विदर्भात द्वितीय स्थानावर वर्धा आणि तृतीयस्थानी नागपूर जिल्हा आहे. भंडारा जिल्हा राष्ट्रीयस्तरावर १६० व्या क्रमांकावर आणि राज्यात १३ व्या स्थानावर आहे. भंडारा जिल्ह्याने ग्रामीण स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता कक्ष यासाठी परिश्रम घेत आहेत.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात केलेल्या कामाची ही पावती होय. नागरिकांना स्वच्छता विषयक सवयी लावण्यात काही प्रमाणात यश मिळाले असले तरी आणखी मोठी मजल गाठायची आहे. भंडारा जिल्हा देशात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
-ज्ञानेश्वर सपाटे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
पाणी व स्वच्छता विभाग,
जिल्हा परिषद, भंडारा.