भंडारा, तुमसर, शहापुरात घरफोडी
By admin | Published: August 2, 2016 12:27 AM2016-08-02T00:27:34+5:302016-08-02T00:27:34+5:30
भंडारा शहरासह जिल्ह्यात अलिकडे घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत...
आरोपीला अटक : एकाच रात्री तीन दुकान फोडले
भंडारा : भंडारा शहरासह जिल्ह्यात अलिकडे घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे घरफोडी असल्यामुळे घर रिकामे ठेऊन जाणे कठिण झाले आहे. पोलिसांची गस्त नियमित होत नसल्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. भंडाऱ्यात सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला तर शहापुरात एकाच रात्री तीन दुकाने फोडली. तुमसरात ५० हजाराचा ऐवज लंपास केलेल्या एका चोरट्याला तुमसर तुमसर पोलिसांनी दोन तासात मुद्देमालासह शेतशिवारातून अटक केली.
घरफोडीत लाखोंचा ऐवज लांबविला
भंडारा : घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. यात त्यांनी १ लाख १५ हजार ६०० रूपयांचे सोन्याचांदीचे दागिणे लांबविल्याची घटना उघडकीस आली. शहरातील स्टेशनरोडवरील सुयोग नगरातील राधेश्याम चोपकर हे कुटूंबासह २७ जुलैपासून बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप लावून असल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधली. त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सोन्याचांदीचे दागिण्यांची चोरी केली. बाहेरगावाहून परतल्यानंतर चोपकर यांच्या लक्षात आली. याप्रकरणी त्यांनी भंडारा पोलिसात अज्ञात चोराविरुध्द तक्रार दाखल केली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वाडे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
शहापुरात एकाच रात्री तीन दुकाने फोडली
शहापूर : येथे ३१ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन दुकानाचे शटर फोडून चोरी केली असून नगदी रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. शहापूर येथील सोपान भुरे यांचे महामार्गावर बुट हाऊस आहे. ३१ जुलैच्या रात्री त्या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने फोडून दुकानात प्रवेश केला व दुकानाच्या गल्ल्यातील चार हजार घेऊन चोरटे पसार झाले. सोपान भुरे यांच्या घरी भाड्याने राहत असलेले तारेन्द्र रहांगडाले यांची दुचाकी घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रविण हावरे यांची सुवर्णा कलेक्शन नावाच्या दूकानाचे शटर सुध्दा फोडले आहे. तसेच बँक आॅफ इंडियाच्या बाजुला असलेली देवचंद कुंभारे यांची अभिनंदन किरणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी फोडले. सोपान भुरे व तारेंद्र रहांगडाले यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक नागरे करीत आहेत. (वार्ताहर)
मुद्देमालासह घरफोड्या गजाआड
तुमसर : भर दुपारी घरी कुणीच नाही ही संधी साधून घराचा कुलूप तोडून ४५ ते ५० हजाराचा सोन्याचा ऐवज चोरट्याने लंपास केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या दोन तासात घरफोड्याला मुद्देमालासह तुमसर पोलिसांनी शेतशिवारातून अटक केली. ३ आॅगस्टपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घरफोडीची घटना खापा तुमसर येथे रविवारी घडली.
संदीप राजाराम भोयर (३५) रा. खरबी असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विष्णू श्रीराम ठवकर, रा. खापा रविवारी सकाळी १० वाजता शेतावर गेले होते. घरी कुणीच नव्हते. घराचा मागील दार तुटला दिसल्याने विष्णु ठवकर यांना शंका आली. घरात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचे समजले. तक्रारीनंतर दुपारी १.३० वाजता तुमसर पोलिसांचे पथक खापा येथे दाखल झाले. चौकशीअंती खापा येथील नागरिकांनी आरोपी व त्यांचा साथीदार खापा येथे दुपारी फिरत होते, अशी माहिती दिली. पोलीसांनी खरबी गाठले. एका शेतात संदीप लपून बसला होता. सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले. संदीपची झडती घेतल्यावर त्याच्या खिशात किंमतीचे सोन्याचे दागिने आढळले. तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोनपिपळे, उपनिरीक्षक श्रीवास, प्रणय चौधरी, विनोद थोटे, अश्विन सोनकुंवर, राजु साठवणे यांनी कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)