Bhandara: भंडारा बाजार समितीत सत्ता कुणाची ? फैसला सोमवारला
By युवराज गोमास | Published: May 21, 2023 04:34 PM2023-05-21T16:34:56+5:302023-05-21T16:35:51+5:30
Bhandara News: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक २२ मे रोजी होणार आहे. निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप व शिंदे गट महाआघाडीत मुकाबला रंगला होता.
- युवराज गोमासे
भंडारा - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक २२ मे रोजी होणार आहे. निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप व शिंदे गट महाआघाडीत मुकाबला रंगला होता. परंतु, दोन्ही गटांना बहुमताचा आकडा न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. राष्ट्रवादीने तीन अपक्षांना गळाला लावल्याने दोन्हींकडे ९ विरुद्ध ९ असे संख्याबळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बाजार समितीत कुणाची सत्ता, कुरघोडीत कोण ठरणार वरचढ, असा प्रश्न जिल्ह्यात चर्चेत आहे.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी ९ संचालक काँग्रेसचे, तर राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गटाचे सहा संचालक तसेच तीन अपक्ष निवडून आले होते. काँग्रेसने प्रयत्न करूनही निवडणुकीत त्यांना बहुमत मिळविता आले नाही. काँग्रेस बहुमतापासून एका मताने दूर राहिली. दरम्यान, राष्ट्रवादीने सत्ताप्राप्तीसाठी तिन्ही अपक्षांना आपल्या गटाशी जोडल्याचे बोलले जाते.
विशेष म्हणजे काँग्रेसने एक संचालक आपल्या गटाशी जोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर राष्ट्रवादीने अपक्षांना सोबत घेत काँग्रेसमधून निवडून आलेल्या संचालकांवर डोळा ठेवला आहे. सत्तास्थापनेसाठी फोडाफोडी होण्याची शक्यता दिसून येताच दोन्ही गटांकडून दक्षता घेतली गेली. दोन्ही गटांनी आपले संचालक देवदर्शनाला पाठविले आहेत. दुपारपर्यंत संचालक शहरात पोहचणार आहेत.
सभेच्या १० मिनिटांपूर्वी मिळणार नामनिर्देशनपत्र
नामनिर्देशनपत्र प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून सभेच्या ठिकाणी १० मिनिटे अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्राधिकृत अधिकारी शुद्धोधन कांबळे यांनी तशी विशेष टीप पदाधिकारी निवड सभेच्या नोटिसीमध्ये नोंदविली आहे. त्यामुळे ऐन नामनिर्देशनपत्र भरण्यावेळी नवनिर्वाचित संचालक हजर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सभेची विषय पत्रिका याप्रमाणे
सभापती व उपसभापतिपदाकरिता नामनिर्देशनपत्र प्राधिकृत अधिकाऱ्याकडे सादर करण्याची वेळ दुपारी ३ ते ३:१५ पर्यंत राहील. छाननी ३:१५ ते ३:३० पर्यंत होईल. उमेदवारी अर्ज मागे घेणे ३:३० ते ३:४५ पर्यंत, आवश्यक असल्यास मतदान घेणे ३:४५ ते ४:१५ पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करणे मतदानानंतर लगेच, असा विषय पत्रिकेनुसार निवडणूक कार्यक्रम राहणार आहे.