भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:56 PM2018-02-27T22:56:47+5:302018-02-27T22:56:47+5:30
भंडारा शहराच्या विकासासाठी पाच कोटींचा तर लाखांदुरसाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलवू, असे आश्वासन आ. डॉ. परिणय फुके यांनी दिला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा शहराच्या विकासासाठी पाच कोटींचा तर लाखांदुरसाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलवू, असे आश्वासन आ. डॉ. परिणय फुके यांनी दिला. एवढ्यावरच न थांबता भंडारा जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याचे त्यांनी आश्वस्त केले.
मागील वर्षी भंडारा येथे झालेल्या नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा शहराच्या विकासाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. भंडारा शहराच्या विकासाकरिता निधी अभावी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे आमदार डॉ. परिणय फुके यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शहराच्या विकासाकरिता निधी देण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी भंडारा शहराच्या विकासासाठी विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत भंडारा शहराच्या रस्त्याकरिता पाच कोटी रुपये निधी मंजूर केला.
तसेच लाखांदूर शहराच्या विकासाकरिता आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केलेली होती. लाखांदूरच्या विकासासाठी नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्याकरिता सहाय्य योजनेअंतर्गत एक कोटींचा निधी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात लाखांदूर व भंडारा शहरामध्ये विकासाची कामे सुरु होणार असून दोन्ही शहराच्या विकासाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिली आहे.
यामुळे भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.