जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण बिघडविणार पंचायत समित्यांचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 04:03 PM2022-02-04T16:03:38+5:302022-02-04T16:09:31+5:30
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे
भंडारा :जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण पंचायत समित्यांचे मात्र गणित बिघडविण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडून सत्ता स्थापन केली, तर पंचायत समितीत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र, २१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीला १३, भाजप १२, शिवसेना व बसपा प्रत्येकी एक आणि चार अपक्ष निवडून आले आहेत. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी होणार, अशी चर्चा रंगत होती. नैसर्गिक मित्र असलेले दोन मित्र एकत्र येत असल्याने याबद्दल कुणालाही अडचण नव्हती. मात्र, गत आठ दिवसांपासून भाजपातील एक नाराज गट सक्रिय झाला आहे. हा गट असून, त्यांच्याकडे सहा सदस्य असल्याचा दावा आहे.
मोहाडी नगरपंचायतीत भाजपाने आपल्या गटासोबत दगाफटका केला तर आपण सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे माजी आमदार चरण वाघमारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
काँग्रेसचे २१ आणि भाजपच्या नाराज गटातील सहा सदस्य एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते. सात पंचायत समित्यांपैकी भाजपने भंडारा, मोहाडी आणि तुमसरमध्ये वर्चस्व सिद्ध केले, तर लाखनी, साकोली आणि पवनीत काँग्रेस वरचढ ठरली. लाखांदूरमध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत.
राष्ट्रवादीची सावध भूमिका
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्याच्या हालचालींनी वेग घेतला असला तरी राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. १३ सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेत काय भूमिका बजावणार, याबाबत स्थानिक नेत्यांनी मौन बाळगले आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जातील, असे सांगतात.
काँग्रेसचे अद्याप मौन
आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडे यावे लागेल, असे स्थानिक नेते सांगत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा गृहजिल्हा आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप सत्ता स्थापनेचे कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे नेमके काय होणार, याची उत्सुकता आहे.