भंडारा जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय वातावरण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 11:46 AM2022-04-27T11:46:36+5:302022-04-27T11:50:18+5:30
येत्या १० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड होणार असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भंडारा : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मुहूर्त अखेर एकदाचा निघाला आणि अध्यक्ष निवडीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने कोण कुणासोबत बसणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. नेत्यांनी अद्यापही मौन साधले असल्याने संभ्रम कायम आहे. आता येत्या १० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड होणार असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकराजनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दोन टप्प्यांत ही निवडणूक घेण्यात आली. १९ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. यात काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना १, बसपा १ आणि अपक्ष ४ असे सदस्य निवडून आले. निकाल घोषित होताच, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला होता. मात्र, ग्रामविकास मंत्रालयाने अधिसूचना जारी केली नाही. परिणामी, सत्तास्थापना रखडली. तब्बल तीन महिन्यांनंतर ग्रामविकास मंत्रालयाने याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिला. त्यावरून पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण काढण्यात आले आणि जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
आता कोण कुणासोबत बसणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसकडे २१ जागा आहेत, तर समविचारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे १३ जागा आहेत. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आले, तर सहज सत्ता स्थापन करता येऊ शकते. महाविकास आघाडीचा प्रयोग राबविल्यास शिवसेनेची त्यात भर पडेल, तसेच चार अपक्षही सत्तेसोबत जाऊ शकतात. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही, परंतु पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल, अशी माहिती आहे. दुसरीकडे १२ सदस्य असलेल्या भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली आहे.