धान घोटाळाप्रकरणी भंडाऱ्याचे पणन अधिकारी गणेश खर्चे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 10:27 PM2023-03-10T22:27:56+5:302023-03-10T22:28:26+5:30
Bhandara News कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांना शुक्रवारी निलंबित केले.
भंडारा : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत झालेल्या धान घोटाळ्यात संबंधित आठ संस्थांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांना शुक्रवारी निलंबित केले.
जिल्ह्यातील आठ संस्थांनी धान खरेदी करताना केलेल्या अनियमिततेमुळे पणन महासंघाला २८ कोटी ३९ लाख रुपयांचा फटका बसल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार जिल्हा पणन अधिकारी खर्चे यांच्या कार्यकाळातला असला तरी त्यांनी संस्थांवर कारवाई केली नाही. माहिती असतानाही खुलासा दिला नाही. संस्थांनी धान खरेदी केल्यानंतर तो प्रत्यक्ष भरडाईसाठी देताना घट आल्याचे दिसून आले. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालावरून जिल्हा पणन अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला. त्यात सर्व प्रकरणात त्यांनी दुर्लक्षपणा, बेजबाबदारपणा केला असून, कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असल्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुग्रीव धपाटे यांनी दिले.
या आहेत आठ धान खरेदी संस्था
धान खरेदीत गैरप्रकार करणाऱ्या संस्थांमध्ये संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था तुमसर, आधार बहुद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, पवनी, अन्नपूर्णा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, बपेरा, संकल्प सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, भंडारा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आंबागड, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, नाकाडोंगरी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, वाहनी, शारदा बहुद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, मुंढरी बुज यांचा समावेश आहे.