महागाईच्या झटक्याने भंडाराकर बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:56 AM2018-10-01T00:56:31+5:302018-10-01T00:56:53+5:30
राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच भंडारा जिल्हावासियांना पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने भंडाराकर चांगलेच धास्तावाले आहे.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच भंडारा जिल्हावासियांना पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने भंडाराकर चांगलेच धास्तावाले आहे. त्यातच पावसाअभावी धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे. परिणामी नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत. पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांना आपला खिसा अधिकच खाली करावा लागत आहे. रविवारी जालना शहरात ९१.५५ रुपयाने पेट्रोलची तर ७८.६८ रुपये या दराने डीझेलची विक्री झाली. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पेट्रोल व डीझेलचे भाव सातत्याने वाढत आहे.
दररोज पेट्रोल व डीझेलचे भाव वाढत असून, याचा परिणाम, शहरातील वाहतुकीच्या दरांमध्ये होत आहे. यामुळे आॅटोचालकही भाव वाढ करण्याच्या विचारात दिसून येत आहेत. यानंतर आता बाजारातील भाजीपाल्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. या भावाढीमुळे सामान्य नागरिक अडचणीत आले आहे. त्यातच जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरीही चिंतेत सापडला आहे.
त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत, अशी मागणी नागरिक करीत आहे. या दरवाढीमुळे जनसामान्यांचे आर्थिक बजेट मात्र चांगलेच डगमगले आहे.