भंडारेकर पितात अशुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 09:49 PM2018-08-04T21:49:43+5:302018-08-04T22:02:20+5:30

पाणी म्हणजे जीवन. परंतु पाण्यानेच मानवी जीवन धोक्यात आणले आहे. भंडारा शहराला वैनगंगा नदीवरून होणारा पाणीपुरवठा हा दूषित असल्याचे वारंवार सिद्ध झाले. मात्र त्यानंतरही कोणत्याच ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. नाग नदीच्या पाण्याने वैनगंगा दूषित झाली असून लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Bhandharekar sapphic water | भंडारेकर पितात अशुद्ध पाणी

भंडारेकर पितात अशुद्ध पाणी

Next
ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : नाग नदीने केली भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा दूषित

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाणी म्हणजे जीवन. परंतु पाण्यानेच मानवी जीवन धोक्यात आणले आहे. भंडारा शहराला वैनगंगा नदीवरून होणारा पाणीपुरवठा हा दूषित असल्याचे वारंवार सिद्ध झाले. मात्र त्यानंतरही कोणत्याच ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही. नाग नदीच्या पाण्याने वैनगंगा दूषित झाली असून लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भंडारा शहराचे वैभव असलेली वैनगंगा गत काही वर्षांपासून दूषित झाली आहे. या नदीच्या पात्रात नागपुरातून वाहणाऱ्या नाग आणि पिवळी नदीचे पाणी येऊन मिळते. गोसेखुर्द प्रकल्पाजवळ हे पाणी वैनगंगेच्या पात्रात मिळते.
नागपूर शहरातील संपूर्ण सांडपाणी आणि एमआयडीसीतील उद्योगाचे रासायनिक पाणी दररोज नाग नदी वैनगंगेत आणून सोडत आहे. तेच पाणी वैनगंगेला दूषित करीत आहे. वैनगंगा नदीवर भंडारा शहराला पाणी पुरवठा करणारी योजना आहे. चेतन बंधाºयातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणून त्याचे शुद्धीकरण केले जाते. परंतु मोठ्या प्रमाणात असलेल्या रासायनिक घटकामुळे पूर्ण क्षमतेमुळे पाणी शुद्धच होत नाही. तेच पाणी नागरिकांना थेट नळावाटे पुरविल्या जाते.
या दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजार जडण्याची भीती आहे. चर्मरोगासह अल्सर, अपेन्डीक्स आणि काविळासारखे आजार होत आहेत. परंतु पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. भंडारा येथील पर्यावरणावर काम करणारी ग्रीन हेरिटेज ही संस्था मात्र नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी लढा देत आहेत. नदीच्या पाण्याचे नमुने नागपुरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यावेळी पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल आल्याचे ग्रीन हेरिटेज संस्थेचे अध्यक्ष मो.सईद शेख यांनी सांगितले. तसेच या संस्थेच्या माध्यामतून मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापही यावर ठोस अशी उपाययोजना झाली नाही. दुसरीकडे नागपूर महानगरपालिकेनेही पाणी शुद्धीकरणाबाबत योग्य नियोजन केले नाही. कागदोपत्री पाणी शुद्ध केल्याचे सांगून तेच पाणी नाग नदीद्वारे सोडले जाते. साध्या डोळ्यानेही नाग नदीचे पाणी बघितले तर गढूळ आणि दूषित दिसून येते. तेच पाणी वैनगंगेत आणि तेथून थेट नागरिकांच्या घरी पोहचत आहे.

३२ गावांतील नागरिकांना बसतोय फटका
गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर ३२ गावातील नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र नाग नदीचे अशुद्ध पाणी येथील नागरिकांना प्राशन करावे लागते. भंडारा शहरात जलशुद्धीकरण यंत्रणा तरी आहे. परंतु ग्रामीण भागात अशी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे थेट पाणी प्राशन करावे लागते. यामुळे पवनी तालुक्यातील अनेक गावात या दूषित पाण्यामुळे ग्रस्त झाल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

खासदारांनी संसदेत मांडला वैनगंगेचा प्रश्न
भंडारा शहरातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पाणी अतिशय शुद्ध आहे. परंतु नागपुरातील अशुद्ध पाणी नाग नदीद्वारे वैनगंगेत सोडले जाते. त्यामुळे आजाराला आमंत्रण मिळत आहे. याबाबत भंडाराचे खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षातही नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसेल तर हे कशाचे द्योतक आहे, असा प्रश्न त्यांनी संसदेत उपस्थित केला. विशेष म्हणजे गंगा शुद्धीकरण मोहीमेसारखीच वैनगंगा शुद्धीकरण मोहीम घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे. तसेच नाग नदीच्या पाण्याचा शुद्धीकरणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे.

इकॉर्नियाचा विळखा
वैनगंगा नदीच्या पात्रात जलपर्णी इकॉर्नियाचा विळखा पडला आहे. ही वनस्पती पात्रात कायम तरंगताना दिसत आहे. या इकॉर्नियामुळे पाणी दूषित होते. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे पाणी दूषित होत आहे.

नाग नदीमुळे वैनगंगेचे पाणी दूषित होत आहे. ग्रीन हेरिटेजच्या माध्यमातून हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून लावून धरला आहे. नाग नदीचे पाणी शुद्ध करण्याबाबत वरिष्ठांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल.
-मो.सईद शेख, अध्यक्ष ग्रीन हेरिटेज संस्था, भंडारा.

Web Title: Bhandharekar sapphic water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.