ट्रिपलसीट दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चढली दुभाजकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:18 PM2023-06-24T12:18:48+5:302023-06-24T12:20:13+5:30

चालकाने स्वत:चे प्राण टाकले धोक्यात : रुग्णालयात उपचार सुरू, सर्व प्रवासी सुखरूप

Bhandra | In an attempt to save the triple-seated students on bike, the bus entered the bifurcation | ट्रिपलसीट दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चढली दुभाजकावर

ट्रिपलसीट दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चढली दुभाजकावर

googlenewsNext

साकोली (भंडारा) : शुक्रवारी, २३ जून पहाटे ५:४५ वाजता गोंदिया-नागपूर जाणाऱ्या बससमोर चौकात अचानक दुचाकीवर ट्रिपलसीट विद्यार्थ्यांनी वळण घेतल्याने बसचालकाने त्यांना वाचविण्यासाठी आपले प्राण धोक्यात टाकून बस डिव्हायडरवर चढविली आणि दुचाकीस्वार विद्यार्थ्यांसह सर्वांचे प्राण वाचविले. मात्र चालकाच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्याला साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. राहुल इलमकर (३६) असे या बसचालकाचे नाव आहे.

साकोली बसस्थानकावरून गोंदिया-नागपूर बस (एमएच ४०, एक्यू ६०८०) ही शहरातील नगर परिषद चौकात जलदगतीने आली असता पश्चिम दिशेने अचानक दुर्गा मंदिर रोडने शिकवणी वर्गाला जाणाऱ्या दुचाकीवर ट्रिपलसीट विद्यार्थ्यांनी वळण घेतले. समोर अचानक बस पाहून विद्यार्थ्याने गोंधळून इकडे तिकडे वळण घेतले. मात्र तरबेज बसचालकाने त्यांना वाचविण्यासाठी एसटीचे जोरदार ब्रेक लावत बस डिव्हायडरवर चढविली. यात डिव्हायडरवरील लोखंडी ग्रिल बसचालकाच्या कक्षेला भेदून लोखंडी रॉड आत घुसला. यामुळे चालकाच्या पायाला जबरदस्त जखमी झाली. तसेच रेडिएटर फुटून बसचे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी बसमध्ये ७ ते ८ प्रवासी भंडारा नागपूर प्रवास करीत होते.

अपघातानंतर प्रवासी विलास मासुरकर यांनी बस वाहकाच्या मदतीने साकोली बसस्थानकासोबत मोबाइलवरून संपर्क साधून जखमी चालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. प्रवाशांसाठी साकोली आगाराची दुसऱ्या बसची व्यवस्था केली. चालकाच्या प्रसंगावधानाचे आणि समयसूचकतेचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांनी केला पोबारा

अपघात घडताच त्या ट्रिपलसीट विद्यार्थ्यांनी दुचाकीसह पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिली. अल्पवयीन आणि परवाना नसतानाही विद्यार्थ्यांना दुचाकी देणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही पालक याकडे दुर्लक्ष करतात. परिणामत: अशा दुर्घटना घडतात. पोलिसांनी अशा विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Bhandra | In an attempt to save the triple-seated students on bike, the bus entered the bifurcation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.