भरदिवसा ४.७५ लाख रुपयांची धाडसी चोरी
By admin | Published: October 10, 2015 12:57 AM2015-10-10T00:57:21+5:302015-10-10T00:57:21+5:30
साकोली-वडसा मार्गावर मुख्य रस्त्यालगत भरदिवसा एका शिक्षकाच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी पाऊणे चार लाख रुपयांचा ऐवज लांबविला.
लाखांदूर येथील घटना : चोरट्यांचा शोध सुरु
लाखांदूर : साकोली-वडसा मार्गावर मुख्य रस्त्यालगत भरदिवसा एका शिक्षकाच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी पाऊणे चार लाख रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना आज शुक्रवारला घडली. वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
विवेक मेश्राम हे शिक्षक असून त्यांची पत्नीसुध्दा शिक्षीका आहे. सकाळी दोन्ही मुली बाहेरगावी निघून गेल्यानंतर हे शिक्षक दाम्पत्य दोघेही शाळेत गेले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन्ही मुली घरी परतल्यानंतर त्यांना समोरचे दार उघडे दिसून आले. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता दोन्ही कपाटाची दारे उघडे दिसून आले. सोने-चांदीचे डब्बे अस्ताव्यस्त दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना तातडीने कळविले.
पोलीस निरीक्षक देवीदास भोयर व सहायक पोलीस उपनिरीक्षक कुंभरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. विवेक मेश्राम यांच्या तक्रारीवरुन सोन्याचे दागिणे आणि रोख १० हजार असे मिळून एकूण ४.७५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंवि ४५४, ३४० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला बोलाविले. मात्र चोरट्यांचा शोध घेण्यास श्वान पथकाला अपयश आले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी धाडसी चोरी झाल्यामुळे लाखांदुरात भीतीचे वातावरण आहे. (तालुका प्रतिनिधी)