भागडी-चिचोली पुलावर मिळतो भात्यावरचा चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:33+5:302021-01-09T04:29:33+5:30
दयाल भोवते लाखांदूर : आधुनिक यंत्रसामग्रीने झपाटलेल्या युगात सर्वत्र आधुनिक साधनांचा वापर होत असताना भागडी -चिचोली पुलावर एक चहा ...
दयाल भोवते
लाखांदूर : आधुनिक यंत्रसामग्रीने झपाटलेल्या युगात सर्वत्र आधुनिक साधनांचा वापर होत असताना भागडी -चिचोली पुलावर एक चहा टपरीचालक पुरातन भात्यावर चहा शिजवून विक्री करताना दिसत आहे.
पुरातन काळी जळावू इंधनासाठी लाकडांचा वापर होत असताना जळालेल्या लाकडापासून उत्पादित कोळसा जाळण्यासाठी कधीकाळी लोहार समाजाने भातायंत्र विकसित केले.या यंत्राचा वापर संबंधित समाजाने परंपरागत व्यवसायांतर्गत विविध लोखंडी साहित्य निर्मितीच्या कामी करण्यात आला. कालांतराने सदर यंत्र लोकोपयोगी ठरत असल्याचे पाहून या साधनाचा वापर अन्य व्यवसायांतही करण्यात आला. मात्र, आधुनिकतेने झपाटलेल्या काळात नैसर्गिक साधन संपत्तीचा झपाट्याने ऱ्हास होत असताना अनेक पुरातन साधने कालबाह्य ठरल्याचे दिसत आहेत.
विविध आजारांपासून बचावासाठी उपभोगाच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होतांना स्टोव्ह, निर्धर चूल, गोबरगॅस, सिलिंडर गॅस यासारख्या साधनांचा वापर बळावल्याने अनेक साधने कालबाह्य झालीत. मात्र, आधुनिकतेच्या नादात वाढत्या महागाईने होरपळून निघणाऱ्या लहान व्यावसायिकांकडून पुरातन साधनांचा वापर केला जात असल्यानेच अनेक कालबाह्य ठरणारी साधने सध्याच्या काळातदेखील वापरात दिसून येत आहेत. अशातच कधी काळी लोहार समाजाने विकसित केलेला भाता कालबाह्य ठरत असतांना भागडी-चिचोली पुलावर या साधनाचा वापर चहा शिजवितांना भट्टीला फुंकर घालतांना पाहून आधुनिकतेच्या काळातही पुरातन साधनांचे महत्त्व अद्यापही कायमच असल्याचे दिसत आहे.