गुडेगांव येथे भीम ज्योत कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:39 AM2021-01-16T04:39:36+5:302021-01-16T04:39:36+5:30
भुयार: पवनी तालुक्यातील मौजा गुडेगांव येथे तीन दिवसीय भीमज्योत कार्यक्रम पार पडला. त्रिरत्न बौद्ध मंडळ गुडेगांवच्यावतीने तीन दिवसीय भीमज्योत ...
भुयार: पवनी तालुक्यातील मौजा गुडेगांव येथे तीन दिवसीय भीमज्योत कार्यक्रम पार पडला. त्रिरत्न बौद्ध मंडळ गुडेगांवच्यावतीने तीन दिवसीय भीमज्योत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत चारुदत हे होते.
या भीमज्योत कार्यक्रमाचे उद्घाटन माजी न्यायाधीश ॲड. महेंद्र गोस्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला श्रेष्ठ संविधान देऊन लोकशाही बळकट केली.तसेच बुद्धाच्या धम्माचे पुनरुज्जीवन करून नवा इतिहास रचला, असे प्रतिपादन करून बुद्धांचे तत्त्वज्ञान सर्वोत्तम आहे,असे स्पष्ट केले.
भदंत चारुदत यांनी बुद्धाचा सदाचाराचा उपदेश सुखकारक आहे, असे प्रतिपादन करून बुद्धांचे विचार कल्याणकारी आहेत, असे स्पष्ट केले.
या भीमज्योत कार्यक्रम प्रसंगी ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी त्रिरत्न बौद्ध विहारासाठी भारतीय संविधान व बुद्ध आणि त्यांचा धम्म असे दोन्ही ग्रंथ भेट म्हणून दिले. प्रास्ताविक गिरीधर गणवीर यांनी केले. समारोपीय भाषण देवराव भुरे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन पांडुरंग मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.