पवनीत आंबेडकर चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:52 PM2019-04-14T22:52:20+5:302019-04-14T22:52:37+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील ऐतिहासिक डॉ.आंबेडकर चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील ऐतिहासिक डॉ.आंबेडकर चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी असल्यामुळे या पुतळ्याला पवनीत ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
या चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची अनेक दिवसापासून मागणी होती. ही मागणी सत्तारुढ असलेल्यांच्या निदर्शनास येताच नगर पालिकेच्या सर्वसाधारण फंडातून २४ लक्ष रुपयाचा निधी या कामाकरिता मंजूर करण्यात आला.
या सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नगरविकास आघाडीचे अध्यक्ष व स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांच्या हस्ते व नगर परिषद अध्यक्ष पूनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, पोलीस निरीक्षक यशवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक डॉ.आंबेडकर पुतळा समितीचे दिनेश गजभिये, सागर खापर्डे, हंसराज रामटेके, सतीश शेंडे, सोनू रंगारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.