तालुका भाजप कार्यकारिणीत मोठे फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:29+5:302020-12-27T04:26:29+5:30
मोहाडी : भारतीय जनता पक्षाच्या मोहाडी तालुका कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले असून मोहाडी तालुकाध्यक्ष व शहर अध्यक्ष बदलण्यात ...
मोहाडी : भारतीय जनता पक्षाच्या मोहाडी तालुका कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले असून मोहाडी तालुकाध्यक्ष व शहर अध्यक्ष बदलण्यात आले असल्याने भाजपच्या एका गटात धूसफूस सुरू आहे. याचा परिणाम येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
मोहाडी व तुमसर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षातुन फुटून काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धरून आपला एक वेगळा गट तयार करून बंडखोरी केली होती. ज्यामुळे भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेला. परंतु काही निष्ठावंत पक्षा सोबतच राहिले. हेच निष्ठावंत भाजप कार्यकारिणीत पदाधिकारी होते. भाजपचे या क्षेत्रात दोन गट पडल्याने दोन्ही कडून एकमेकांवर सोशल मीडियातून अनेक आरोप सुध्धा करण्यात आले. शेवटी वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही गटाचे मनोमिलन करून दिले. सगळे काही ठीक चालत असताना अचानक दोन दिवसा अगोदर भाजप जिल्हाध्यक्षांनी मोहाडी व तुमसर तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता दोन्ही तालुक्यात फक्त एकाच गटातील व्यक्तींची तालुका व शहर अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने पुन्हा असंतोष उफाळून आला आहे. तर मोहाडी येथील भाजपचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असल्यामुळे असंतुष्ट गटातील पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी तुमसर येथे बैठक बोलावून जिल्हा अध्यक्षाकडे आपली नाराजी व्यक्त केली. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखा भाजीपाले, श्याम झिंगरे, मुन्ना पांडे, गीता कोंडेवार, बाबू ठवकर, दिनेश निमकर, वंदना आकरे, कुंदा वैद्य, कलाम शेख, विश्वनाथ बांडेबुचे, रविकांत देशमुख, हितेंद्र पवनीकर, नरेंद्र निमकर सह तुमसर व मोहाडी तालुक्यातील प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या फेरबदलामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या फेरबदलाचे दुष्परिणाम दिसण्याची चिन्हे आहेत.