ॲण्टिजेन टेस्ट किट उपलब्ध नसल्याने लोकांची मोठी गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:36 AM2021-04-22T04:36:18+5:302021-04-22T04:36:18+5:30
सध्या सर्दी, ताप, खोकला यांचे प्रमाण घरोघरी दिसत आहे. खासगी दवाखान्यांत तर सकाळपासून मोठी गर्दी बघावयास मिळते. त्यामुळे डॉक्टर ...
सध्या सर्दी, ताप, खोकला यांचे प्रमाण घरोघरी दिसत आहे. खासगी दवाखान्यांत तर सकाळपासून मोठी गर्दी बघावयास मिळते. त्यामुळे डॉक्टर सरकारी दवाखान्यात ॲण्टिजेन टेस्ट करण्यास लोकांना सांगत असतात. पण, सध्या ॲण्टिजेन टेस्ट करणाऱ्या किटचा सध्या येथे तुटवडा असल्याने लोकांची मोठी निराशा होत आहे. कोंढा कोसरा व परिसरात जवळपास २० ते २५ हजार लोकसंख्या आहे. ताप व इतर लक्षणे दिसत असल्याने लोक स्वतः होऊन टेस्ट करण्यास समोर येत आहेत. कोंढा येथील आरोग्य केंद्रावर ५६ गावांची आरोग्यसेवा अवलंबून आहे, त्यामुळे येथे ॲण्टिजेन टेस्ट दररोज होणे गरजेचे आहे.
आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे, पण याचा रिपोर्ट येण्यास आठ ते दहा दिवस लागत असल्याने लोकांची मोठी अडचण होत आहे. पवनी तालुका शिवसेनाप्रमुख विजय काटेखाये यांनी यासंबंधी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याशी बोलून कोंढा केंद्रात किट उपलब्ध करण्यास आरोग्य विभागास सांगितले आहे. परिसरात रुग्णसंख्या वाढत असताना रुग्ण दुरुस्त होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. फक्त लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ताप व इतर लक्षणे दिसल्यास टेस्ट करणे गरजेचे आहे. तरी तुटवडा लक्षात घेता ॲण्टिजेन टेस्ट कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्याची मागणी तालुका शिवसेनाप्रमुख विजय काटेखाये यांनी केली आहे.
कोट
"ॲण्टिजेन टेस्ट किट उपलब्ध नाही. मात्र, केंद्रात आरटीपीसीआर टेस्ट सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात टेस्ट किटचा तुटवडा असल्याने हे पाऊल उचलले आहे. नागरिकांनी लक्षणे दिसत असल्यास टेस्ट करून घेणे आवश्यक आहे."
- डॉ. अतुल बोरकर,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोंढा