शासकीय जागेवर उभारली स्मार्ट बाजारची भली मोठी इमारत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:32 PM2024-10-19T13:32:59+5:302024-10-19T13:34:39+5:30

गावठाण जागा दाखविली खासगी: नगर परिषद, महसूल अधिकाऱ्यांची डोळेझाक

Bigger building of smart market built on government premises | शासकीय जागेवर उभारली स्मार्ट बाजारची भली मोठी इमारत

Bigger building of smart market built on government premises

राहुल भुतांगे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
तुमसर :
येथील विनोबा भावे नगरातील भंडारा रोडवरील (गावठाण) सरकारी जागेची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावून ती खासगी जागा दर्शवून त्यावर टोलेजंग स्मार्ट बाजारची इमारत बांधण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


तुमसर-भंडारा रोडवरील सदर जागेचे जुने खसरा क्र. ११०० असून त्याकरिता बनविण्यात आलेली बोगस आखीव पत्रिका ३२३१ च्या सिरीजमधील ही जागा आहे. सन १९७२ मध्ये भूमी अभिलेख विभाग अस्तित्वात आल्यानंतर ही जागा नझूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. या जागेकरिता नझूल विभागाद्वारे मूळ मालकाचा उल्लेख न करता 'गायरान' या शेऱ्यासह आखीव पत्रिका तयार करण्यात आली. नंतर, ३१ वर्षांनंतर तलाठ्याने कुणाच्या आदेशाने वारसदार म्हणून फेरफार घेतला व ही शासकीय जागा खासगी असल्याचे दर्शविले, यावर प्रश्नचिन्ह आहे. 


महाराष्ट्र भूराजस्व संहिता १९५४ च्या कलम २३३ ते २३७ प्रमाणे गावठाण म्हणून घोषित करण्यात आलेली जागा ही तुमसर गावठाण नकाशामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तुमसरकरांची आहे. या संबंधी उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांना भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. 


उपविभागीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 
सदर जागा ही गावठाणची सरकारी असल्याने ती नगर पालिकेच्या ताब्यात घेण्याकरिता प्राप्त तक्रारीवर ३ मार्च २०२३ व २७ जुलै २०२३ ला उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीपती मोरे यांच्या सहीनिशी उपविभागीय अधिकारी तुमसर यांना, संबंधित प्रकरणी नियमानुसार चौकशी करून कारवाई करावी आणि अहवाल सादर करावा, असे पत्र दिले होते. मात्र संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नसल्याने आज स्मार्ट बाजारची इमारत उभी झाली आहे. मध्य प्रदेश जमीनदारी उन्मुलन कायदा १९५० व महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ च्या कलम १२२ अंतर्गत शासनाद्वारे संपादन करण्यात आलेली गायरान/गावठाण व आबादीकरता निश्चित होती, मात्र या नियमाचे उल्लंघन झाल्याचे येथे दिसत आहे.


"गावठाणची जागा ही सरकार मालकीची असते. सदर जागा नगर परिषदेच्या ताब्यात येत असून, त्यांना या प्रकरणी संबंधितावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात येईल."
- मोहन टिकले, तहसीलदार, तुमसर
 

Web Title: Bigger building of smart market built on government premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.