महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:08 AM2024-07-09T00:08:21+5:302024-07-09T00:08:47+5:30
महामार्ग ओलांडत असताना कारधा चौकात घडली घटना
देवानंद नंदेश्वर, भंडारा: महामार्ग ओलांडत असलेल्या एका ६८ वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास महामार्गावरील कारधा चौकात घडली. संपत गोविंदा भोयर (६८, कारधा, ता. भंडारा), असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
संपत भोयर हे एमएटी दुचाकी क्रमांक एमएच ३५ ई ७६०३ ने पालगाव येथून स्वगृही कारधा येथे जात होते. दरम्यान महामार्गाने लाखनीकडून नागपूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०४ एमटी ९४९६ च्या चालकाने महामार्ग ओलांडत असलेल्या संपत भोयर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे संपत भोयर ट्रकमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने कोणतीच मदत न करता ट्रक सोडून घटनास्थळावरुन पळून गेला.
यासंदर्भात जयश बबन बोंदरे (४१, आंबाडी) यांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६ (१), तसेच मोटार वाहन कायदा सहकलम १३४, १८४ नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुदाम कांबळे करीत आहेत.