वाटमारीने फुटणार तांदूळ तस्करीचे बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 05:00 AM2021-07-31T05:00:00+5:302021-07-31T05:00:42+5:30

विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार परप्रांतातून धान आणि तांदुळाची निर्यात महाराष्ट्रात करता येत नाही. निर्यात करावयाची असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. जीएसटी बिलासह त्याची पूर्तता करावी लागते. परंतु परप्रांतातून तांदूळ खरेदीसाठी शासन परवानगी देत नाही. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धान पिकतो. खरीप व रबी या हंगामात धान खरेदी करतेवेळी शासनाच्या नाकी नऊ येते. धान ठेवायला गोदामही नसतात.

Bing of rice smuggling will explode | वाटमारीने फुटणार तांदूळ तस्करीचे बिंग

वाटमारीने फुटणार तांदूळ तस्करीचे बिंग

googlenewsNext
ठळक मुद्देकोट्यवधीचा व्यवहार : सखोल चौकशी झाल्यास मोठे मासे गळाला लागणार

संजय साठवणे
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : परप्रांतातून स्वस्त तांदूळ विकत आणून तो शासनाला अधिक किमतीत विकण्याच्या काही राईसमिल चालकांचा गोरखधंद्याचा पर्दाफाश साकोली तालुक्यात झालेल्या २२ लाख ५० हजार रुपयांच्या वाटमारीने होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तस्करीच्या दृष्टिकोनातूनही तपास करण्याची गरज आहे. मात्र राजकीय दबावतंत्राचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्नही सुरू झाल्याची माहिती आहे. 
साकोली तालुक्यातील पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर दोन दिवसांपूर्वी वाटमारी झाली होती. तेलंगणातील रमेश अन्ना याचा दिवानजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर हा तांदूळाच्या रकमेच्या   वसुलीसाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास भिरकड याचे रमेश अन्नाकडे दहा लाख रुपये ट्रक भाड्याचे थकले होते. त्यामुळेच त्याने लुटमारीचा कट रचला आणि २२ लाख ५० हजार रुपये लुटलेही परंतु भंडारा पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेने तो जेरबंद झाला. एखाद्या ट्रक मालकाचे धान व्यापाऱ्याकडे दहा लाख रुपये ट्रक भाड्याचे थकीत होत असेल तर किती मोठ्या प्रमाणात पूर्व विदर्भात तेलंगणातून तांदूळ आला असेल याची कल्पनाही करवत नाही. 
विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार परप्रांतातून धान आणि तांदुळाची निर्यात महाराष्ट्रात करता येत नाही. निर्यात करावयाची असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. जीएसटी बिलासह त्याची पूर्तता करावी लागते. परंतु परप्रांतातून तांदूळ खरेदीसाठी शासन परवानगी देत नाही. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धान पिकतो. खरीप व रबी या हंगामात धान खरेदी करतेवेळी शासनाच्या नाकी नऊ येते. धान ठेवायला गोदामही नसतात. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असतात. अशास्थितीत परप्रांतातून तांदूळ येतो म्हणजे नक्कीच त्यामागे काहीतरी काळेबेरे असण्याचा संशय आहे. या वाटमारीच्या प्रकरणाचा तांदूळ तस्करीशी संबंध जोडून तपास केल्यास मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे. लुटमार प्रकरणाने भंडारा जिल्ह्यातील तांदूळ तस्करीचे बिंग फुटण्याची शक्यता आहे. आता गरज आहे ती वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशीची.

अशी होते तांदळाची अदलाबदल

आधारभूत खरेदी केंद्रावर शासन धानाची खरेदी करते. हा धान मिलर्सला भरडाईसाठी दिला जातो. त्यासाठी त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. एक क्विंटल धानापासून ६७ क्विंटल धानाचा उतारा येणे अपेक्षित असते. हा तांदूळ नंतर स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविला जातो. मात्र अधिक पैसे कमावण्याच्या नादात व्यापारी परराज्यातून तांदूळ १८ रुपये किलो दराने खरेदी करतात. नंतर हाच तांदूळ शासनाला २४ रुपये किलो दराप्रमाणे विकतात. शासनाकडून आलेल्या आदेशानुसार शासकीय धान खरेदी केंद्रातील धान पुन्हा व्यापाऱ्यांनाच विकतात, असा हा गोरखधंदा जिल्ह्यात सुरू आहे. कोट्यवधीच्या घरात उलाढाल असते. 

निकृष्ट धान खरेदीची सुरू आहे चौकशी 
- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निकृष्ट धान खरेदी प्रकरण विधानसभेत गाजले होते. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली होती. त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याच बरोबर आता परप्रांतीय तांदळाची चौकशी केल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. 

सखोल चौकशीची गरज 
- तांदूळ खरेदी प्रकरणात कोट्यवधी उलाढाल केली जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होण्याची गरज आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये उकळणारे पुढे येतीलच परंतु आतापर्यंत आयकर, विक्रीकर आणि जीएसटीचे बुडविलेले पैसेही पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु राजकीय वरदहस्तात प्रकरण दडपले जाण्याची शक्यता आहे. काही राईस मील चालक यात सहभागी असल्याने कारवाई होईल की नाही यांची शंका आहे.

 

Web Title: Bing of rice smuggling will explode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.