डेरेदार वृक्षांवर जाळे लावून पक्ष्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:53+5:302021-02-24T04:36:53+5:30
अड्याळ : डेरेदार वृक्षावर जाळे टाकून पक्ष्यांची शिकार करण्याचा प्रकार पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात खुलेआम सुरू आहे. शिकारी दररोज ...
अड्याळ : डेरेदार वृक्षावर जाळे टाकून पक्ष्यांची शिकार करण्याचा प्रकार पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात खुलेआम सुरू आहे. शिकारी दररोज पक्ष्यांची शिकार करून त्याची विक्री करतात. वनविभागाने मात्र अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. अखेर पक्षिमित्रांनीच दखल घेत झाडावरील जाळे काढून दोन पक्ष्यांना जीवदान दिले तर सहा पक्षी मृतावस्थेत आढळले.
अड्याळ परिसरात घनदाट जंगल आहे. ठिकठिकाणी लहान मोठे तलाव आहेत. त्यामुळे तेथे वन्यप्राणी व पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. अशाच पक्ष्यांवर आता शिकाऱ्यांची नजर गेली आहे. डेरेदार वृक्षांवर जाळे टाकूण ठेवले जाते. त्यानंतर त्यात पक्षी अडकले की त्यांची बाहेर विक्री केली जाते. तीन दिवसांपूर्वी एका अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या तरुणाचे लक्ष या जाळ्याकडे गेले. तेथेच चर्चा करण्यात आली. हा प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे. परंतु वनविभागाने आजपर्यंत कुणावरही कारवाई केली नाही. अनेक पक्ष्यांचे बळी शिकाऱ्यांनी घेतले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वी दोन बिबट्यांचा विहिरीत पडून गुढ मृत्यू झाला होता. त्याचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. अशातच आता शिकारीचे प्रकरण पुढे येत आहे. हे शिकारी नेमके कुठले जाळे कधी टाकतात याची चौकशी करून शिकारीच्या प्रकरणाला आळा घालण्याची गरज आहे.
बॉक्स
पक्षिप्रेमींनी काढले झाडावर टाकलेले जाळे
अड्याळ परिसरातील स्मशानभूमीत एक डेरेदार वृक्ष आहे. या वृक्षावर जाळे टाकल्याचे लक्षात आले. त्यावरून पक्षिप्रेमी आशिक नैताम, संदीप शेंडे, दिनेश पाठक, साजन आपतुरकर हे त्या ठिकाणी पोहचले. झाडावर चढून त्यांनी जाळे काढले. त्यावेळी सहा पक्षी मृतावस्थेत तर दोन जिवंत आढळले. या दोन पक्षांना पाणी पाजून सोडून देण्यात आले. वनविभागाने अशा शिकाऱ्यांचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी पक्षिप्रेमी करीत आहेत.