भाजपाचा उमेदवार घोषित, राष्ट्रवादीचा गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:03 PM2019-03-24T22:03:04+5:302019-03-24T22:04:18+5:30
भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवाराच्या नावावरुन गत महिन्याभरापासून सुरु असलेल्या तर्कवितर्कांना भाजपाने रविवारी पुर्णविराम दिला. नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी घोषीत केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्यातच होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार सोमवारी आपले नामांकन दाखल करुन शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवाराच्या नावावरुन गत महिन्याभरापासून सुरु असलेल्या तर्कवितर्कांना भाजपाने रविवारी पुर्णविराम दिला. नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी घोषीत केली. तर राष्टÑवादी काँग्रेसचे नाव रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्यातच होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार सोमवारी आपले नामांकन दाखल करुन शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात गत महिन्याभरापासून राष्ट्रवादी आणि भाजपा उमेदवारांच्या नावावर तर्कवितर्क लावले जात होते. नामांकनाचा शेवटचा दिवस जवळ आलातरी भाजपा आणि राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रविवारी सायंकाळपर्यंतही निश्चित झाला नव्हता.
राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी १ वाजतापासून बैठक सुरु होती. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील महत्वपुर्ण नेते उपस्थित होते. सायंकाळपर्यंत उमेदवाराच्या नावावर खल करण्यात आला. परंतु अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. दुसरीकडे वृत्तवाहिन्यांवर विविध नावे झळकत होती. पंरतु राष्ट्रवादीकडून अधिकृत दुजोरा दिला जात नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? यावर तर्कवितर्क लावले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचे नामांकन सोमवारी दाखल केले जाणार आहे. भंडारा येथील जलाराम मंगल कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ होईल. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, खासदार मधुकर कुकडे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
रविवारी सकाळपासून विविध वृत्तवाहिन्यांवर भाजपाचे उमेदवार म्हणून सुनील मेंढे यांचे नाव झळकत होते. परंतू त्याला कुणीही अधिकृत दुजोरा देत नव्हते. अखेर सायंकाळी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून भंडारा-गोंदियासाठी सुनील बाबुराव मेंढे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचे सचिव जगदप्रसाद नड्डा यांनी छत्तीसगढ, मेघालय आणि महाराष्ट्रातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. या यादीत महाराष्ट्रातील एकमेव भंडारा-गोंदियाचे सुनील मेंढे यांचा नावाचा समावेश आहे. त्यामुळे गत काही दिवसांपासुन सुरु असलेल्या विविध चर्चांना पुर्णविराम मिळाला.
भाजपा-सेना युतीचे उमेदवार सोमवारी आपले नामांकन दाखल करणार आहे. यावेळी भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, म्हाडाचे अध्यक्ष तारीक कुरेशी, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशीवार, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, आमदार गिरीश व्यास, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, हेमंत पटले, बाळा अंजनकर उपस्थित राहणार आहेत.
नामांकनातून शक्तीप्रदर्शन
लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालविली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार २५ मार्च हा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत केवळ ६ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. शुक्रवारपर्यंत ९६ उमेदवारांनी २१५ अर्जांची उचल केली होती. आता त्यापैकी कितीजण नामांकन दाखल करणार हे सोमवारीच कळणार आहे. दोन्ही पक्ष मिरवणुकीद्वारे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित नामांकन दाखल करणार आहे.