तुमसर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-राकाँ शरद पवार गटाची बाजी

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: May 13, 2024 05:55 PM2024-05-13T17:55:40+5:302024-05-13T17:56:34+5:30

Bhandara : राज्यातील सत्ता समीकरण पायदळी; आजी-माजी आमदाराच्या गटाचाही पराभव

BJP-NC Sharad Pawar group wins in Tumsar Bazar Samiti election | तुमसर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-राकाँ शरद पवार गटाची बाजी

BJP-NC Sharad Pawar group wins in Tumsar Bazar Samiti election

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारी घोषित झाला. तब्बल अडीच वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने हातमिळवणी करून स्थापन केलेल्या बळीराजा जनहित पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन करून १० संचालक निवडून आणले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आमदार राजू कारेमोरे यांचे शेतकरी विकास परिवर्तन पॅनल व माजी आमदार चरण वाघमारे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जय किसान महाविकास पॅनलचा दारूण पराभव केला. यात आमदार राजू कारेमोरे यांच्या पॅनलचे चार व चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनलचे तीन संचालक निवडून आले. एका अपक्ष संचालकाने येथे बाजी मारली.

विद्यमान आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे, भाऊराव तुमसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. राज्यातील सत्ता समीकरण बाजूला ठेवून येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची हातमिळवणी झाली. बळीराजा जनहित पॅनल भाऊराव तुमसरे यांच्या नेतृत्वात लढले. भाजप व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही युती होती. यात काँग्रेसचेही सदस्य निवडणुकीकरिता एकत्र आले होते. त्यांच्या गटाचे १० संचालक निवडून आले. तुमसरे हे सभापतीपदाची हॅट्ट्रीक करण्याची शक्यता अधिक आहे.

मतमोजणीला दीनानाथ मंगल कार्यालय येथे सकाळी नऊ वाजल्यापासून सुरूवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी विलास देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतमोजणीचे कार्य पार पाडले. विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशाच्या गजरात विजयी मिरवणूक काढून गुलाल उधळला.

हे आहेत विजयी उमेदवार
सेवा सहकारी संस्था गट : बळीराजा जनहित पॅनलचे भाऊराव तुमसरे, रामदयाल पारधी, किरण अतकरी, डॉ. हरेंद्र रहांगडाले, डॉ. अशोक पटले, प्रमोद कटरे, वैशाली पटले, राजेश पटले, बिनविरोध गणेश बावणे, जय किसान महाविकास पॅनलचे रामप्रसाद कटरे, शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या शारदा गाढवे.

अडते/व्यापारी गट : शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे हरिशंकर समरीत, बळीराजा जनहित पॅनलचे अरविंद कारेमोरे.
हमाल मापारी गट : भोजराम वंजारी (अपक्ष)
ग्रामपंचायत गट : जय किसान महाविकास पॅनलचे कलाम शेख, रवींद्र बाभरे, शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे राजू माटे व दिलीप गजभिये.

आजी-माजी आमदारांच्या गटाचा दारुण पराभव
आमदार राजू कारेमोरे यांच्या गटाचे केवळ चार तर माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाचे केवळ तीन संचालक निवडून आले. सहकार क्षेत्रात वावरणाऱ्या व प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क असणाऱ्या पॅनललाच येथे मतदारांनी पसंती दिली. अर्थकारणाला मतदारांनी पसंती दिल्याची चर्चा आहे.

Web Title: BJP-NC Sharad Pawar group wins in Tumsar Bazar Samiti election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.