भाजप ओबीसीविरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:28 PM2018-02-17T22:28:25+5:302018-02-17T22:28:48+5:30
केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे ओबींच्या खच्चीकरणासाठी लागलेले आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांची ५०० कोटींची शिष्यवृत्तीमध्ये ९० टक्के कपात केली असून....
आॅनलाईन लोकमत
भंडारा : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे ओबींच्या खच्चीकरणासाठी लागलेले आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांची ५०० कोटींची शिष्यवृत्तीमध्ये ९० टक्के कपात केली असून या माध्यमातून सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केला आहे.
राज्यस्तरीय ओबीसी बचाव जनजागृती अभियान मोहिमेचे शनिवारला भंडारा येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर यांच्या कक्षात घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी हा आरोप लावला आहे.
बाळबुधे यांनी भाजप सरकारवर आरोप लावताना शरद पवार यांनी मंडल आयोग लागू करताना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पुढाकार घेतला. मात्र भाजप सरकारने ५०० कोटींची शिष्यवृत्तीमध्ये कपात करून ७२ कोटींवर आणली. आता त्यात पुन्हा कपात करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्ये ९० टक्के कपात करून ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचा घाट रचला आहे. एकंदरीत भाजप सरकार ओबीसी विरोधी असून या सरकारच्या महत्वकांक्षा उधळून लावण्यासाठी राज्यभरात १२ डिसेंबरपासून ओबीसी जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांची सांगितले. या अभियानाचा समारोप १४ एप्रिलला बारामती येथे करण्यात येणार असून यानंतर २ मेपर्यंत सरकारकडून ओबीसींच्या हिताचे निर्णय न घेतल्यास मंत्रालयावर हजारो ओबीसी बांधवांसह धडक देवून मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसींच्या शिष्यवृत्ती कपातीचा घाट रचनाºया भाजप सरकारने आॅनलाईनची जाचक अटी लादल्या आहेत. हे सरकार जातीयवादी असून भाजपाचेच ओबीसी नेते सुभाष घाटे यांनी ओबीसींवरील अन्यायाविरूद्ध आवाज उठविल्याने त्यांनाही पक्षातून काढल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. गायीला वाचवा आणि बाईला नाचवा, असा प्रकार भाजप सरकारच्यावतीने सध्या सुरू असल्याचा आरोप त्यांनी पत्रपरिषदेतून भाजप सरकारवर लावला. जातीय दंगली घडवून आता पोटशाखेत अंतर्गत भांडण लावण्याचा प्रकारही भाजप करीत असल्याचा आरोप ईश्वर बाळबुधे यांनी लावला.
पत्रपरिषदेला जि.प. उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तुरकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे, सुभाष वाघमारे, उमराव सेलोकर, हितेश साठवणे, गिरधर बुरबादे, श्रावण डोये, शिवशंकर गायधने आदी उपस्थित होते.