भाजपचे जनआक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:51+5:302021-06-04T04:26:51+5:30
भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारला चुकांची जाणीव करून देण्यासाठी व आरक्षण परत ...
भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारला चुकांची जाणीव करून देण्यासाठी व आरक्षण परत मिळविण्यासाठी भंडारा जिल्हा भाजपच्या वतीने गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण संकटात आले आहे. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यात बाजू मांडण्यात शासन अपयशी ठरले. कुणाच्या चुकांमुळे ओबीसीचे आरक्षण अडचणीत आले, असा आरोप करीत आणि या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाचा निषेध करणारे फलक हातात घेऊन शेकडो कार्यकर्ते आणि ओबीसी समाजबांधव सहभागी झाले होते. सुरुवातीला भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार डाॅ. परिणय फुके आणि शिवराम गिऱ्हेपुंजे यांनी शासनाच्या ओबीसीविरोधी धोरणाचा पाढा वाचला.
या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, ओबीसी आघाडीचे प्रमुख कोमल गभणे, माजी आमदार चरण वाघमारे, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे, प्रदीप पडोळे, चामेश्वर गहाणे, चैतन्य उमाळकर, प्रशांत खोब्रागडे, मुन्ना फुंडे, राजेश बांते, अरविंद भालाधरे, ब्रम्हानंद करंजेकर, संजय कुंभलकर, आशू गोंडाणे, तिलक वैद्य, इंद्रायणी कापगते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बाॅक्स
न्याय मिळेपर्यंत लढू - सुनील मेंढे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे रद्द ठरविण्यात आलेले आरक्षण आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसींच्या बाबतीत असलेली अनास्था यातून दिसून आली. भाजप सरकारने दिलेले आरक्षण आघाडी सरकार टिकवू शकले नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील, असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.