काळी-पिवळीने बालकाला चिरडले
By admin | Published: January 1, 2016 01:18 AM2016-01-01T01:18:40+5:302016-01-01T01:18:40+5:30
तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी येथे शाळेत जाणाऱ्या एका बालकाला भरधाव काळीपिवळीने चिरडल्याने
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी येथे शाळेत जाणाऱ्या एका बालकाला भरधाव काळीपिवळीने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली.
अनमोल विजय सूर्यवंशी (५) रा.बिनाखी असे मृत बालकाचे नाव आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर दररोज सर्रासपणे ३५ ते ४० काळी पिवळी धावत आहेत. दरम्यान बिनाखी येथील अनमोल सूर्यवंशी हा बालक गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास रस्त्याच्या कडेने शाळेत जात होता. बपेरा येथून तुमसरच्या दिशेने जाणाऱ्या काळी पिवळी क्र. एम.एच. ३६ - ३३३० ने राज्य मार्गावर त्या बालकाला चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाहन चालकाने बालकाला सिहोरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगताच वाहनचालक महेश शेंदरे वाहनासह पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान बालकाचा मृत्यू झाल्याची वार्ता गावात पोहोचताच गावकऱ्यांनी सरपंच लिलाधर किरणापुरे, उपसरपंच देवेंद्र मेश्राम, उमेश तुरकर, राजेंद्र बघेले, विणा गणवीर, सतीश बघेले यांच्या नेतृत्वात तुमसर-बपेरा मार्गावर काळी पिवळी वाहने कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलन केले. राज्य मार्गावर लाकडांचे ओंडके ठेऊन वाहतूक रोखण्यात आली. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला. यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)