लोहारा, जांब परिसरातील पऱ्हे पावसाअभावी करपू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:23 AM2021-07-08T04:23:39+5:302021-07-08T04:23:39+5:30
रमेश लेदेजांब /लोहारा : मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडाक्याचे ऊन पडत असल्याने धानाचे पऱ्हे करपण्यास ...
रमेश लेदेजांब /लोहारा :
मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडाक्याचे ऊन पडत असल्याने धानाचे पऱ्हे करपण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पाऊस झाला नसल्याने पूर्णपणे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार धानाचे पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असली, तरी अद्यापही दमदार पावसाअभावी अनेक ठिकाणी रोवणी झालेली दिसून येत नाही. पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरवर्षी शेतकरी खरीप हंगामात नव्या जोमाने तयारीला लागतो. तसाच यावर्षीही बळीराजाने बँकचे कर्ज तसेच उसनवार करून खरीप हंगामाची जुळवाजुळव केली. गत आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी उलटा संकटात सापडला आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहिणी, मृग, आर्द्रा, नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेऊन, तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या साहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर असून, येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. गत वर्षाचा तोटा भरून निघेल, या आशेने अनेकांनी मिळेल तिथून कर्ज घेतले; मात्र ऐन खरीप हंगामातच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. काही ठिकाणी पाणी आहे; पण वीज नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे.
मात्र गत आठवड्यापासून पावासाने दडी मारल्याने पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहेत. बळीराजाने केलेला खर्च निघेल की नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोहारा, जांब, कांद्री, धोप, हिवरा, पिटेसुर, रोंघा, लेंडेझरी, लंजेरा, देऊळगाव, ताळगाव, सकरला, आंबागड, रामपूर आदी परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त झाले आहेत. परिवाराच्या पालनपोषणासाठी अनेकांना रोजगाराची चिंता सतावू लागली आहे.