गारपिटीचा पुन्हा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:04 PM2019-03-20T22:04:54+5:302019-03-20T22:05:08+5:30
जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीने बुधवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली येथे मेघगर्जनेसह दुपारी ३ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. गारपिटीचा सर्वाधिक फटका मोहाडी तालुक्याला बसला असून पाचगाव येथील फळबाग गारपिटीने उध्वस्त झाली. अनेक ठिकाणी गारांचा खच पडलेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीने बुधवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली येथे मेघगर्जनेसह दुपारी ३ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. गारपिटीचा सर्वाधिक फटका मोहाडी तालुक्याला बसला असून पाचगाव येथील फळबाग गारपिटीने उध्वस्त झाली. अनेक ठिकाणी गारांचा खच पडलेला होता.
जिल्ह्यात बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह टपोर थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली. भंडारा शहरात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. काही वेळातच मेघ गर्जनेसह टपोर थेंबाचा पाऊस बरसू लागला. पावसासोबत तुरीच्या आकाराच्या गारांचा वर्षाव सुरु झाला. तब्बल अर्धा तास सुरु असलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. वादळामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर तब्बल दोन तास वीज पुरवठाही खंडीत झाला होता. साकोली तालुक्यालाही पावसाचा जोरदार फटका बसला. सायंकाळी झालेल्या या पावसाने मोठे नुकसान झाले.
मोहाडी तालुक्याला गारपिटीचा फटका
मोहाडी : मोहाडी परिसरात १५ ते २० मिनिट गारांसह वादळी पाऊस झाला. कान्हळगाव, खमारी, मांडेसर, सिरसोली, हरदोली, मोरगाव, मोहगाव (देवी), पारडी आदी गावात गारांसह पाऊस बरसला. या परिसरात गव्हाचे मोठ्या प्रमाणात पीक असून गारपिटीने गहू उध्वस्त झाला. चना पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोरगाव परिसरात वाळण्यासाठी टाकलेल्या मिरच्याही गारपिटीने ओल्या झाल्या आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
पाचगाव येथे गारांचा खच
वरठी : मोहाडी तालुक्यातील वरठी परिसराला गारपिटीचा प्रचंड तडाखा बसला. पाचगाव येथील माजी सरपंच व माजी उपसभापती कमलेश कनोजे यांची फळबाग गारपिटीने पूर्णत: उध्वस्त झाली. शेतात सर्वत्र गारांचा खच पडल्याचे दिसत होते. भोसा टाकळी परिसरातही गारपिटीने मोठे नुकसान झाले. मोहगावसह अनेक ठिकाणी बोर आणि आवळ्याच्या आकाराची गार पडली. या गारपिटीच्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले आहेत.
होळीच्या उत्साहावर विरजण
जिल्ह्यात सर्वत्र होळी सणाचा उत्साह सकाळपासून दिसत होता. गावागावात होळी पेटविण्याची जय्यत तयारी सुरु झाली होती. मात्र दुपारी झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडले. होळी पेटविण्यासाठी आणलेले लाकडे ओली झाली होती.