बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:34 PM2017-09-07T23:34:18+5:302017-09-07T23:35:11+5:30
एकेकाळी कुबेरीनगरी म्हणून ओळख असलेल्या तुमसर शहराला अतिक्रमणाची नगरी म्हणून संबोधले जायचे. परंतू नगर परिषदेच्या पुढाकाराने बाजार परिसरातील अतिक्रमण काढून त्या जागेवर नाल्या, .....
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एकेकाळी कुबेरीनगरी म्हणून ओळख असलेल्या तुमसर शहराला अतिक्रमणाची नगरी म्हणून संबोधले जायचे. परंतू नगर परिषदेच्या पुढाकाराने बाजार परिसरातील अतिक्रमण काढून त्या जागेवर नाल्या, रस्ते व सुभोभीकरणावर भर दिल्याने गजबजलेल्या बाजार पेठेने आता मोकळा श्वास घेतला आहे.
तुमसर शहराला अतिक्रमण ग्रासले होते. त्यामुळे शहराचे नियोजन व विकासाची कामे ठप्प पडली होती. ही बाब जाणून घेत नगर परिषदेने व बाजार परिसरातील अतिक्रमण काढण्यावर भर दिला. यापूर्वी अतिक्रमण काढण्यात आले नव्हते असे नाही. परंतू ते नियोजन नसल्यामुळे बाजारपेठ जशीच्या तशीच होत गेली. याहीवेळेस तसेच होणार असे सर्वानाच वाटत होते. परंतु नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व त्यांच्या चमुने वेळीच नियोजन करून अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेवर नाली बांधकाम रस्ते बांधकाम, सुशोभिकरण तसेच दुकानदारांना आवश्यक सेवा पुरवून बाजारपेठ परिसराला मोकळे केले.
एवढेच नव्हे तर नियोजन कार्यान्वित करण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकी वाहनाकरिता पार्किंगची जागा नियोजित करण्यात आली. त्यात संताजी समाज मंदिरचा बाजुचा मैदान, मोर हिंदी शाळा व पोस्ट आॅफिस समोरील रिकामी जागा ट्रेझरी कार्यालयाच्या बाजुची जागा या जागा येथील मंगळवारचा आठवडी बाजार लक्षात घेऊन पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण दिशेतील जागेत आपले दुचाकी व चारचाकी वाहन उभे करू शकणार आहेत. बाजाराच्या दिवशी किंवा इतरही दिवशी शहरात तथा बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीस तसेच रहदारीस नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे.
शहराचे योग्य नियोजन राखणे व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने न.प. ने हा केलेला छोटासा प्रयोग आहे व त्यात आम्ही यशस्वीही झालोत याचे अभिमान आहे.
-प्रदीप पडोळे,
नगराध्यक्ष तुमसर.