भंडारात काँग्रेसतर्फे रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:00 AM2020-10-02T05:00:00+5:302020-10-02T05:00:33+5:30
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे पीडितेच्या परिवाराला भेटण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.
खासदार राहूल गांधी यांना धक्काबुक्की आणि अटक झाल्याची माहिती होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई आणि जिल्हा प्रभारी प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते एकत्र आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ४ वाजता ठिय्या देवून केंद्र सरकारच्या विरुध्द घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव प्रमोद तितिरमारे, धनंजय तिरपुडे, शफी लद्दानी, अजय गडकरी, दिलीप मासुरकर, राकेश कारेमोरे, पवन वंजारी, कैलाश भगत, आवेश पटेल, सुरेश मेश्राम, राजकपूर राऊत, प्रमोद मानापूरे, गौरीशंकर मोटारे, सचिन घनमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची काही काळ भंबेरी उडाली. मात्र अवघ्या अर्ध्या तासात आंदोलकांची समजूत काढून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला. मात्र या आंदोलनाने तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.