पालांदूर येथील भागवत सप्ताहात रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:33+5:302021-02-12T04:33:33+5:30
पालांदूर : भागवत सप्ताह म्हटला की हरिनाम असतो. अध्यात्मिक प्रबोधन करीत सद्गुणांचा मार्ग सांगितला जातो. परंतु यासोबतच सामाजिक कार्याची ...
पालांदूर : भागवत सप्ताह म्हटला की हरिनाम असतो. अध्यात्मिक प्रबोधन करीत सद्गुणांचा मार्ग सांगितला जातो. परंतु यासोबतच सामाजिक कार्याची जोड अध्यात्माला मिळाली तर... निश्चितच भागवत सप्ताहाचा खरा अर्थ समाजाला मिळू शकतो. असाच समाजाला प्रेरणादाई ठरलेला लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील भागवत सप्ताह आरोग्य शिबिराची जोड देत महत्त्वपूर्ण व आदर्शव्रत ठरला. यात ४० तरुणांनी रक्तदान करीत हरिनामाला सामाजिक कार्याची जोड दिली.
पालांदूर येथे २ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन पार पडले. भागवतकार अर्थात कथाकार हभप मुक्ताश्री पंढरपूरकर यांनी समाजाला विविध धार्मिक कार्यक्रम देत ईश्वराच्या सद्गुणांची ओळख करून दिली. सातही दिवस सप्ताहाला पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी हजेरी लावली होती. अशा या मंगलमय सोहळ्यात भागवत सप्ताह समिती व ग्रामपंचायत कार्यालय पालांदूर यांनी पुढाकार घेत आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन भागवत सप्ताहप्रसंगी गोपाल कालच्या दिवशी आयोजित केले होते. या शिबिराला समर्पण ब्लड बँक भंडारा व नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जीभकाटे यांनी सहकार्य केले.
या आरोग्य शिबिराला सरपंच पंकज रामटेके पालांदूर, उपसरपंच स्वप्निल खंडाईत कवलेवाडा, युवा कार्यकर्ता देवेश नवखरे, डॉक्टर प्रशांत फुलझले ग्रामीण रुग्णालय पालांदूर, युवा कार्यकर्ता सागर वंजारी, श्याम चौधरी गुरुजी, शुभम प्रधान, आशुतोष भोंडे, अभियंता उमंग गायधने, महेश चाचेरे, अंकित खंडाईत आदींनी सहकार्य केले. समर्पण ब्लड बँकेचे डॉक्टर ओकार नखाते, परिचारिका यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य देत आरोग्य शिबिराला सेवा दिली. आरोग्य शिबिराने प्रेरित झालेले पंढरपूर येथील भागवतकार मंडळींनी पालांदूर येथील समस्त तरुणांचे गुणगौरव करीत भागवत सप्ताह समितीचे अभिनंदन केले.
Attachments area