किन्हीत तरुणाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:20 PM2019-01-20T22:20:05+5:302019-01-20T22:20:23+5:30
प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली असून अनिकेत अशोक बडोले असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर अनिकेतचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली असून अनिकेत अशोक बडोले असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर अनिकेतचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, अनिकेत हा शुक्रवार १८ जानेवारीपासून बेपत्ता होता.
अनिकेतच्या कुटूंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र अनिकेतचा कुठेही शोध लागला नाही. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारा अनिकेतचा मृतदेह किन्ही गावाजवळ असलेल्या नाल्यात आढळून आला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पोहचताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.
प्राथमिक माहितीवरुन अनिकेतचा गळा आवळून खून केल्याचे दिसून आले. त्याने घातलेल्या टिशर्टनेच त्याचा गळा आवळण्यात आल्याचे दिसून आले. माहिती मिळताच साकोली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. शवविच्छेदनासाठी अनिकेतचा मृतदेह साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन होवू शकले नाही.
रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. अनिकेतचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते, अशी चर्चा आहे. या प्रेमसंबंधाच्या संशयातूनच त्याची हत्या झाली असावी अशा साकोली पोलिसांचा कयास आहे.
मृतक अनिकेत याच्या मोठ्या भावाच्या तक्रारीवरुन साकोली पोलिसांनी किन्ही येथील चार जणांविरुध्द भांदविच्या ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रेवतकर, खोब्रागडे, पोलीस नायक श्रीकांत मस्के, प्रशांत गुरव, पोलीस शिपाई पी. सी. सोनुने करीत आहेत.